कोल्हापूर - नेहमीच विविध उपक्रम राबवून आपल्या गावचे नाव राज्यभरात पोहचविणाऱ्या कोल्हापुरातल्या माणगाव ग्रामपंचायतीने आता पुन्हा एकदा अफलातून उपक्रम हाती घेतला आहे. 'टीव्हीवरील शाळा' असे या उपक्रमाचे नाव आहे. खरंतर सगळीकडे ऑनलाईन शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी प्रत्यक्षात यामध्ये अनेक अडचणी आहेत. मात्र, माणगाव ग्रामपंचायतीने याला पर्याय म्हणून 'टीव्हीवरील शाळा' उपक्रम सुरू केला आहे.
'टीव्हीवरील शाळा' उपक्रम नेमका काय आहे? -
कोरोनाचा फटका अनेक क्षेत्राला बसला तसा तो शैक्षणिक क्षेत्रालाही बसला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनाकडून अनेक दिवसांपासून शैक्षणिक वर्ग बंद ठेवण्याचे आदेश आहेत. अशातच मुलांनाही आता शिक्षणाची गोडी कमी होताना पाहायला मिळत आहे. कोल्हापुरातल्या हातकणंगले तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीने 'टीव्हीवरील शाळा' हा उपक्रम हाती घेतला आहे. खरंतर प्रत्यक्षात शाळा सुरू करण्याची अद्यापही परवानगी नसली तरी 'टीव्हीवरील शाळा' या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून गावातील मुलांना घर बसल्या शिक्षण घेता येत आहे. 'ऑनलाईन शिक्षण'च्या माध्यमातून मुलांना मोबाईलवर शिक्षण मिळत होते. मात्र, अनेकांकडे मोबाईल नव्हते, मोबाईल असले तर नेटवर्क नसायचे, त्यात शिक्षक काय शिकवत आहेत, हे मोबाईलमध्ये नीट समजायचे नाही. मोबाईलमध्ये शिक्षकांनी बोर्डवर काय लिहले आहे, हे सुद्धा समजायचे नाही. त्यावर उपाय म्हणून माणगाव गावचे सरपंच राजू मगदूम यांच्यासह उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी मिळून गावातील केबलच्या माध्यमातून प्रत्येक घरात शाळेतून थेट प्रक्षेपण करू शकतो का, याबाबत विचार केला. यासाठी त्यांनी अनेकांकडून तांत्रिक मदत घेतली. या उपक्रमामध्ये केबल ऑपरेटरही महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे.
पुन्हा मुलांना शिक्षणाची गोडी; मुले मोबाईलपासून दूर -
मोबाईलचे फायदे जरी असले तरी लहान मुलांच्या हातात मोबाईल देण्यामागे अनेक दुष्परिणामही आहेत. मात्र ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून अनेक लहान मुलांकडे आता पालकांना नाईलाजाने मोबाईल द्यावे लागत आहेत. यामुळे लहान-लहान मुलांना मोबाईलची प्रचंड सवय लागली आहे. ऑनलाइन तासाच्या नावाखाली अनेक मुले तासंतास मोबाईल हातात घेऊन बसलेले असतात. मात्र, यावर उपाय म्हणून माणगावमध्ये सुरू केलेल्या 'टीव्हीवरील शाळा' उपक्रमामुळे मुले ज्या पद्धतीने शाळेत बसतात त्याच पद्धतीने दररोज टीव्ही समोर बसलेले पाहायला मिळत आहेत. केबल टीव्हीच्या माध्यमातून शाळेतून थेट प्रक्षेपण केले जात असून त्याचा पूर्ण सेटअप तयार करण्यात आला आहे. यामध्ये कोणत्याही पद्धतीने व्यत्यय येत नसून अनेक पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. शिक्षकांना सुद्धा या माध्यमातून शिकवायला सोप जात असून मुलांनाही गोडी लागली आहे.
गावातील सर्व शाळांमध्ये सुरू आहे उपक्रम -
माणगाव गावामध्ये एकूण चार शाळा आहेत त्यामध्ये जिल्हा परिषदेची एक, दोन खाजगी आणि एक उर्दू माध्यमची शाळा आहे. या चारही शाळांमध्ये समन्वय साधून दररोज 11 ते 5 या वेळेत प्रत्येक वर्गानुसार वेळ ठरवण्यात आली आहे. या माध्यमातून ठराविक वेळेत पहिली ते दहावी वर्गातील ठराविक वर्गासाठी शिक्षण दिले जाते. प्रत्येक विषयाचा तास 30 मिनिटांचा केला आहे. सध्या 3 कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याचे थेट प्रक्षेपण व्हावे यासाठी त्याचे कनेक्शन गावातील केबल नेटवर्कला दिले आहे. शिवाय यामध्ये आणखीन काही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे माणगाव गावचे सरपंच राजू मगदूम यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हटले आहे. दरम्यान, गावात सद्या 700 ते 800 केबल टीव्ही कनेक्शन आहेत. शिवाय कोणी शिक्षणापासून वंचित राहत नाही ना, याचीही काळजी घेतली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
'टीव्हीवरील शाळा' उपक्रमासाठी जिल्हा प्रशासन गावात -
माणगाव गावातील टीव्हीवरील शाळा उपक्रम नेमका काय आहे, हे जाणून घेण्यासाठी स्वतः जिल्ह्याच्या प्रभारी जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी माणगाव गावाला भेट दिली. हा उपक्रम कसा सुरू आहे, याबाबत माहिती घेतली. शिवाय यापूर्वी सुद्धा गावात अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत, याचेही त्यांनी कौतुक केले. त्यांच्या या कौतुकामुळे माणगाव गावच्या ग्रामपंचायतीला सुद्धा अधिक चांगले काम करण्याचे बळ मिळाले आहे.
हेही वाचा - नारायणास्त्राचा सामना करण्यासाठी शिवसेनाच्या जोर-बैठका, आज उद्धव ठाकरे जिल्हा प्रमुखांशी बोलणार