कोल्हापूर- तौक्ते चक्रीवादळामुळे कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. तर अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्या आहेत. जिल्ह्यातील तुकडी येथे वैरण आणण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय शाळकरी मुलाचा तुटलेल्या प्रवाहीत विज तारेला स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवार दुपारी एक वाजता हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथे घडली. संस्कार उर्फ बाँबी बाळू गायकवाड असे विजेचा झटका लागून मरण पावलेल्या मुलाचे नाव आहे.
तारेला स्पर्श होऊन जागीच मृत्यू
हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथले पेंटर व्यवसाय करणारे बाळू गायकवाड यांचा मुलगा संस्कार हा अतिग्रे इथल्या पायोनियर हायस्कुल मध्ये इयत्ता 10मध्ये शिकत आहे. मंगळवारी दुपारी तो पंचगंगा नदीकडील एका शेतामध्ये वैरण आणण्यासाठी गेला होता. दरम्यान शितल भोकरे यांच्या गट नंबर 1695मधून 11 हजार होल्टची एचटी लाईन गेली आहे. सोमवारी झालेल्या वादळामुळे तार तुटून खाली पडली होती. तुटल्यानंतरही त्या तारेतून विद्दुत पुरवठा सुरुच होता. तार न दिसल्याने संस्कारचा त्या तारेला स्पर्श झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच गायकवाड कुटुंब आणि वीज मंडळाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. वीज कर्मचाऱ्यांनी तात्काळ वीज पुरवठा खंडित केला. या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरमध्ये पाठावण्यात आला आहे. दोन दिवसापुर्वी 11 हजार होल्टची तार तुटून साजणी इथल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. वादळामुळे अनेक ठिकाणी तारा तुटलेल्या आहेत. त्यामुळे शेतामध्ये जाणाऱ्या नागरीकांनी जागृत राहण्याची गरज आहे.