कोल्हापूर - केंद्रात गेल्या सात वर्षांपासून भाजपाचे सरकार आहे. या सात वर्षांच्या काळात या सरकारने केवळ काळा कारभार केला, अशी टीका गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे. शिवाय गेल्या सात वर्षांत देशाची प्रगती रोखून देश अडचणीत आणला, असल्याचेही पाटील यांनी सांगितले. पेट्रोल दर वाढवले, महागाई वाढ याच्याच निषेधार्थ शहरात काँग्रेसकडून निदर्शने करण्यात आली. यावेळी मोदी सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजीही करण्यात आले.
'मोदी सरकार सगळ्याच बाबतीत फेल'
गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, की अच्छे दिनची आशा दाखवून देशात आलेले मोदी सरकार सगळ्याच बाबतीत फेल झाले आहे. लोकांनाही आता हे समजले आहे. केवळ प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करणे आणि इमेज मॅनेजमेंट इतकेच काम या सात वर्षात झाले आहे. गेल्या डिसेंबरमध्ये राहूल गांधी यांनी कोरोना बाबत सांगितले होत. तेव्हा मात्र मोदी नमस्ते ट्रम्प आणि निवडणूकीत व्यस्त होते. त्यावेळीच खबरदारी घेतली असती तर आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती निर्माण झाली नसती, असेही सतेज पाटील यांनी सांगितले. दरम्यान, पीएम केअरमधून आलेले अनेक व्हेंटिलेटर खराब झाले आहे. देशाला जर व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन पुरवठा करू शकत नसेल तर हे सरकार पूर्णपणे कोलमडलेले सरकार आहे, असेच म्हणावे लागेल, अशी टीकाही यावेळी सतेज पाटील यांनी केली आहे.
हेही वाचा-पंडित नेहरु, गांधींच्या पुण्याईवर देश चालतोय, मोदींनी आत्मचिंतन करावे - संजय राऊत