कोल्हापूर- 'भाजपचं आंदोलन म्हणजे नेत्यांनी अस्तित्व दाखवण्यासाठी केलेला स्टंट'. अशी टीका पालकमंत्री सतेज पाटील यांनी माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर नाव न घेता केली आहे. तर चंद्रकांत पाटील हे पुण्याचे आहेत. सुट्टीसाठी ते कोल्हापुरात येतात असा टोला देखील पालकमंत्री पाटील यांनी लगावला. हिंमत असेल तर भाजपने केंद्र सरकारच्या विरोधात हे आंदोलन उभे करावे, कारण केंद्रामुळे शेतकऱ्यांवर ही परिस्थिती ओढवली आहे. राज्य सरकार आपल्या परीने शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचेही ते म्हणाले.
पाटील पुढे म्हणाले, राज्य सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. नुकतीच त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात, दुग्धविकास मंत्री सुनील केदार आणि ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत बैठक झाली आहे. शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे. मात्र, केंद्राने १० हजार टन दूध पावडर आयात करताना दूध उत्पादकांचा विचार केला का? असा सवाल पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला. केवळ व्यापाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन शेतकऱ्यांना भुर्दंड सोसायला लावायचा ही भूमिका केंद्र सरकारची आहे. अशी टीका पालकमंत्री पाटील यांनी केली. गोकुळ दूध संघावर भाजपच्या नेत्यांचीच सत्ता आहे. दूध उत्पादकांना खरेदी दर वाढवून देण्याची भूमिका संचालकांनी जाहीर करावी. शेतकऱ्यांकडून २६ रुपयांनी दूधघेता, व मुंबईत तेच दूध ४९ ते ५८ रुपयांनी दूध विक्री करता. मग मधील २४ रुपयांचा फरक कुठे जातो? असा सवाल पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला. कोल्हापूरच्या भाजपच्या नेत्यांनी हिंमत असेल तर २४ रुपायांमधील ५ रुपये शेतकऱ्यांना द्यावे, असे आवाहन देखील पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
हिंमत असेत तर केंद्र सरकार विरोधात आंदोलन करा - राजू शेट्टी
'आमचं आंदोलन हे राज्य आणि केंद्र सरकार विरोधातील होतं, मात्र भाजपची केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्याची हिंमत नाही'. अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भाजप आणि मित्रपक्षांनी दूध दरवाढीच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनावर केली आहे. सोबतच हिंमत असेल तर केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्याचं आव्हान देखील त्यांनी केलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंक उघडा: 'हिंमत असेल तर केंद्र सरकार विरोधात आंदोलन करा'
'राजू शेट्टी म्हणजे गावात सोडलेला वळू' - सदाभाऊ खोत
'राजू शेट्टी हे आता काजू शेट्टी झाले असून या भंपक माणसाला आता कोणी किंमत देत नाही, तसेच त्यांची अवस्था आता गावात देवाला सोडलेल्या वळू प्रमाणे झालेली आहे. त्यामुळे आता काय करावे आणि काय नाही, हे सूचत नसल्याने राजू शेट्टी यांनी दूध दराच्या आंदोलनाचे नाटक केले आहे'. असा आरोप माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंक उघडा: राजू शेट्टी म्हणजे गावात सोडलेला वळू; सदाभाऊ खोतांचा जोरदार पलटवार