कोल्हापूर - राज्यात आजही कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. अनेकांना व्हेंटिलेटर बेड मिळत नाहीत. कोरोनाचा धोका अजूनही टळला नाहीये याची खासदार संभाजीराजेंना जाणीव आहे. त्यामुळेच ते टप्प्याटप्प्याने आपली भूमिका मांडत आहेत. मात्र दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना नेमकं काय झाले आहे? काही माहीती नाही असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हंटले आहे. शिवाय चंद्रकांत पाटील सत्ता गेल्यापासून अस्वस्थ झाले आहेत, आणि आता संभाजीराजेंनी आंदोलन केले पाहिजे मोर्चे काढले पाहिजे असे त्यांना वाटत आहे. मात्र संभाजीराजे संयमाने आपली भूमिका मांडत असून, त्यांच्यासारख्या नेतृत्वाची आज गरज असल्याचेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे. गडहिंग्लज येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, संभाजीराजे यांची भूमिका अगदी योग्य आहे. त्यामुळेच ते संयमाने पुढे जाऊयात असे म्हणत आहेत. मात्र चंद्रकांत पाटलांना वाटत आहे की, संभाजीराजेंनी आंदोलने, मोर्चे काढले पाहिजे. आंदोलकांना उसकवले पाहिजे. मात्र ज्या पद्धतीने संभाजीराजे संयमाने पुढे जात आहे, त्यामुळे संभाजीराजेच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे आंदोलन नक्कीच यशस्वी होईल.
ममता बॅनर्जींमुळे मोफत लसीकरणाचा निर्णय - मुश्रीफ
यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, देशातील 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्याची केंद्राची जबाबदारी होती. ती जबाबदारी शेवटी पंतप्रधान मोदींनी घेतली आहे. आम्ही सुद्धा सातत्याने याबाबत मागणी करत होतो. खरंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या राज्यातील 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला आपला फोटो वापरला. त्यामुळेच 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण केंद्र सरकार करेल अशी घोषणा मोदी यांनी केल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले. 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणावर मोदींनी आपला फोटो वापरला, मात्र ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या राज्यात 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणात आपला फोटो वापरला. त्यामुळे संपूर्ण देशात मोफत लसीकरण करण्यामागे हे सुद्धा एक कारण असल्याचा टोला मुश्रीफ यांनी यावेळी लगावला आहे. शिवाय 18 वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाची जबाबदारी घेतल्याबद्दल मोदींचे आभार सुद्धा मानले आहेत.
हेही वाचा -राजकीय विशेषज्ञ प्रशांत किशोर-शरद पवार यांच्यात खलबते