कोल्हापूर - 'एकच धून सहा जून' असे म्हणत दरवर्षी शिवप्रेमी सहा जूनला रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी हजोरोंच्या संख्येने जमा होतात. पण यंदाच्या वर्षी कोरोनाचे संकट महाराष्ट्रासह जगावर आले आहे. यामुळे यंदाच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा यंदा मावळ्यांनी घराघरातून साजरा करावा, असे आवाहन खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे. कोरोनाचा पार्श्वभूमीवर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे, संभाजीराजे यांनी सांगितले.
दरवर्षी शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्ताने हजारो शिवभक्त रायगडावर दाखल होतात. मात्र यंदा कोरोनाच्या या महाभयंकर अशा संकटामुळे त्यांचा हिरमोड झाला आहे. मात्र प्रजाहितदक्ष राजासाठी मावळ्यांनी गडावर गर्दी न करता त्यांनी आपल्या घरी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करावा. तसेच कोणत्याही गडावर न जाता घरच आपला गड असे समजून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करा, असे आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे.
दरम्यान, रायगडावरील ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी आणि त्याचा साक्षीदार होण्यासाठी, देशभरातूनच नव्हे तर जगभरातील शिवभक्त आतुर असतात. यामुळेच दरवर्षी शिवभक्तांचा गडावर उपस्थितीचा आलेख उंचावत आहे. यंदाही हा ऐतिहासिक सोहळा मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे ठरवले होते. पण, कोरोना महामारीचे संकट पाहता समाजहीत डोळ्यासमोर ठेवून सोहळा अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्याचे नियोजन केले आहे. यंदाचा सोहळा साधेपणाने साजरा होणार आहे.
हेही वाचा - कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील वाढदिवशी राबवणार 'हा' उपक्रम
हेही वाचा - जिल्हा संचारबंदीचा भंग केल्याप्रकरणी संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल