कोल्हापूर - पुणतांबा येथील शेतकऱ्यांच्या मुलींनी केलेल्या अन्नत्याग उपोषणाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी सरकारच्यावतीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, की शेतकऱ्यांच्या मुलींनी सुरू केलेले उपोषण सरकारने मोडीत काढले नाही. तसेच शेतकऱ्यांच्या मुलींच्या मागण्या लेखी स्वरुपात घेतल्या असून सरकारने त्यांना लेखी उत्तर दिले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ते कोल्हापुरात बोलत होते.
शिंदे म्हणाले, की उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांच्या मुलीची तब्येत प्रचंड खालावलेली होती. त्यामुळे त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. एखाद्याच्या जीवाशी खेळणे हे बरोबर नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले, की खासदार राजू शेट्टी हे देखील अनेक आंदोलने करतात. काही आंदोलन तर टोकाची असतात. मात्र, या शेतकऱ्यांच्या मुलींनी केलेले उपोषण हे त्यांचे वय पाहता त्यांची प्रकृती पाहता चिंताजनक होते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. तसेच राजू शेट्टींनी यापूर्वी जी आंदोलने केली, त्या आंदोलनात त्यांनी आश्वासन दिल्यानंतर माघार घेतल्याचे शिंदेनी सांगितले. त्यामुळे आता पुणतांब्याच्या उपोषणाचा विषय संपला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.