कोल्हापूर - चळवळीतल्या लोकांच्या नादाला लागू नका, पंचनामा करायला लागलो तर अंगावर कपडे असूनही नागडे झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं जास्त अंगावर आला तर तुमच्या अंगलट येईल, अशी जोरदार टीका स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांवर केली आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत कोल्हापुरात महाआघाडीचा मेळावा पार पडला यावेळी ते बोलत होते.
गेल्या काही दिवसांपासून राजू शेट्टी आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात टीका प्रतिटीकांच्या फैरी झडू लागल्या आहेत. राजू शेट्टींनी मोदी लाटेत निवडून येऊन आपले घर भरले. शिवाय कारखादारांकडून पैसे घेऊन शेट्टींनी सेटलमेंट केली असल्याचा आरोप सुद्धा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना शेट्टी यांनी चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला. महसूलमंत्र्यांनी कधीही बिंदू चौकात यावे आणि पुराव्यासहित सांगावे मी कोणत्या कारखानदाराकडून पैसे घेऊन सेटलमेंट केली. माझ्यावर आरोप करण्याआधी तुम्ही काय केले ते सांगा. सांगली कोल्हापूर रस्त्यांच्या २० कोटींचा हिशोब दादांनी द्यावा. हे पैसे कुठे आणि किती खर्च झाले सांगावे, असे आव्हान देत कंपन्यांची मांडवली करून सगळे रस्ते खासगीकरणातून केले, मग तुम्ही काय विकास केलात असा सवालही त्यांनी चंद्रकांत पाटील यांना केला आहे. चळवळीतल्या लोकांच्या नादाला लागू नका, नाहीतर अंगावर कपडे असून पण नागडे झाल्याशिवाय राहणार नाही असा सल्ला सुद्धा यावेळी शेट्टींनी महासुलमंत्र्यांना दिला.