कोल्हापूर- बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेचा कमी दाब हा महाराष्ट्राच्या दिशेने सरकल्याने राज्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होऊन पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने तातडीची मदत जाहीर करून ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.
राजू शेट्टी पुढे म्हणाले, राज्यात ढगफुटी सारखी परिस्थिती ओढावली गेली. त्यामुळे या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. मागील वर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना 25 हजाराची तातडीची मदत जाहीर करावी, अशी मागणी केली होती. आता उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर करावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली. तसेच केंद्रसरकारने देखील तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
केंद्राचे पुन्हा एकदा मदतीचे आश्वासन-
राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सोबत चर्चा करून मदतीचे आश्वासन दिले आहे. 'महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांच्याशी बोललो. आपत्तीग्रस्त बंधू-भगिनींबरोबर माझ्या सहवेदना आहेत. बचाव आणि मदतकार्यामध्ये केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल अस आश्वासन मी पुन्हा एकदा दिले असल्याची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली आहे.