कोल्हापूर - निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या दुखा:ला मी कवटाळत बसलो असतो, तर शेतकरी हतबल झाला असता. ठेच लागली म्हणून पायाचा अंगठा कापायचा नसतो, तर ती जखम बरी करून पुन्हा जोमाने कामाला लागायचे असते, असे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले.
![kolhapur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3777964_hagga.jpg)
देशातील शेतकरी आभाळाकडे आशाळभूत नजरेने बघत हतबल झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी कार्यकर्त्यांनी पराभव विसरून जोमाने कामाला लागावे, असे आवाहनही राजू शेट्टी यांनी केले. जिल्ह्यातील आंबा येथे झालेल्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ता अभ्यास शिबीरात ते बोलत होते.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची लोकसभा निवडणुकीतील आढावा तसेच निवडणुकीत पक्षाला आलेले अपयश, त्याची कारणमीमांसा आणि विचारमंथन, केंद्र व राज्य सरकारचे शेतकरी विरोधी धोरण, त्यामुळे उद्ध्वस्त झालेली शेती व गावगाडा तसेच त्याचे परिणाम. पक्ष, युवा आघाडीची संघटनात्मक बांधणी, आगामी विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानीची भूमिका तसेच आंदोलनाची दिशा या विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
![kolhapur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3777964_nnnn.jpg)
राज्यामध्ये जवळपास २ हजार किलोमीटरचा दुष्काळ दौरा केला. शेती क्षेत्राकडे सरकारने दुर्लक्षित केल्याने व राज्यातील शेतकऱ्यांसमोरील संकटे वाढल्यामुळे दिवसेंदिवस आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न हातात घेऊन त्यांना न्याय देण्यासाठी रात्रीचा दिवस करावा असेही शेट्टी म्हणाले.