कोल्हापूर - हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार खा. राजू शेट्टी यांच्या मतदारसंघातील इचलकरंजी येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. मनसेकडून लोकसभेसाठी कोणीही रिंगणात नाही. तरीही राज ठाकरे भाजपविरोधी प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रभर सभा घेत आहेत. आज सायंकाळी ६ वाजता इचलकरंजी येये सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
यापूर्वी शिवाजी पार्क, मुंबई, नांदेड आणि सोलापूर येथील जाहीर सभांमधून राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार तोफ डागली आहे. शिवाय मोदींनी दिलेली आश्वासने कशी फोल ठरली आहेत याची पोलखोल राज ठाकरे उदाहरणासह दाखवत आहेत. त्यांच्या झालेल्या सर्वच सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आज सायंकाळी हातकणंगले मतदारसंघात त्यांची सभा होणार आहे.
हातकणंगलेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यात लढत होणार आहे. शेट्टी यांचा प्रतिस्पर्धी उमेदवार हा शिवसेना पक्षाचा असल्यामुळे आजच्या सभेत राज ठाकरे शिवसेनाला टारगेट करण्याची शक्यता आहे. ऊस दर, कारखानदारी, दूध दर, यंत्रमाग, उद्योगांचे वाढलेले वीजदर यांवर राज ठाकरे काय भाष्य करतात का? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.