कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा खासगी सावकार सहकार विभागाच्या रडारवर आहेत. कारण जिल्ह्यातील नऊ सावकारांवर छापेमारी करत त्यांच्याकडील आक्षेपार्ह कागदपत्रे आणि कोरे धनादेश जप्त करण्यात आले आहेत. जयसिंगपूर, हरोळी, धरणगुत्ती, तारदाळ, खोतवाडी याठिकाणी सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात आली असून कोल्हापूर शहरातल्या एका सावकाराचादेखील यामध्ये समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खासगी सावकारांचे प्रमाण वाढले आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सहकार विभागाने कारवायांचा धडाका लावला आहे. जिल्ह्यातील नऊ सावकारांवर कारवाई झाल्याने इतर खासगी सावकारांच्या पोटात सुद्धा गोळा आला आहे.
कारवाई पथक
सहकार विभागाने केलेल्या कारवाईमध्ये जयसिंगपूरमधील रमेश पडियार, रमेश कुंभार व श्रीधर गुरव या तिघांचा समावेश आहे, धरणगुत्ती गावातील अण्णासाहेब बाळासाहेब पाटील, शिरोळ तालुक्यातील हरोली गावातील रोहित पाटील, हातकलंगले तालुक्यातल्या खोतवाडीमधील शिवगोंडा पाटील आणि दीपक बाळू खोत, कोल्हापूर शहरातील उमेश हिंदुराव काशीद, आणि राधानगरी तालुक्यातल्या पुंगाव गावातील संजय श्रीपती भांदीगरे या नऊ जणांचा समावेश आहे.
कारवाईमध्ये जप्त केलेले दस्तऐवज
सहकार विभागाने केलेल्या कारवाईमध्ये सावकारांच्या घरांमधून कोरे तसेच लिखित चेक आणि बॉंड, कच्चा नोंदीच्या वही, खरेदीखत जमिनीच्या संबंधित कागदपत्रे, संचकारपत्रे असे दत्तवेज सापडले आहेत. दरम्यान, उपनिबंधक कार्यालयाकडे या सवकारांबाबतच्या लेखी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार सहकार उपनिबंधक अमर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने जिल्ह्यातील 9 खाजगी सावकारांच्या घरावर छापा टाकत दस्तावेज जप्त करून कारवाई केलीये.