कोल्हापूर - जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. सद्यघडीला या दरवाजामधून ७ हजार क्यूसेक इतका विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरू आहे. राधानगरी धरण भरले की कोल्हापूरकरांचा वर्षभराचा पाणी प्रश्न मिटतो. यंदाच्या वर्षी देखील हे धरण भरले आहे. हे धरण कोल्हापुरकरांसाठी जीवनदायिनी आहे. का आहे या धरणाचा इतिहास काय आहे जाणून घ्या...
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टी विचारातून भोगावती नदीवरील फेजीवडे गावाजवळ राधानगरी धरण 1909 ला बांधण्यास सुरुवात झाली. हरित क्रांतीच्या देशव्यापी पर्वाचा जणू आरंभच कोल्हापूरातून करण्यात आला. शेतीच्या पाणी पुरवठ्यासाठी व वीज निर्मितीचा उद्देश नजरेसमोर ठेऊन या दगडी धरणाच्या पायाची प्राथमिक कामे सुरु झाली. 1909 ते 1918 या कालावधीमध्ये 40 फुट उंचीचे काम झाले व त्यातून 600 दलघफु इतका पाणीसाठा निर्माण झाला. त्याचा उपयोग पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठीही होवू लागला. 1939 साली धरणाचे काम पुन्हा सुरु करुन 1954 साली धरणाचे काम पूर्ण करण्यात आले. धरणातील पायथ्याशी वीजगृह उभारुन 1.20 मेवॅटची 4 जनित्रे बसवून महाराष्ट्र राज्य वीज मंडळाकडून वीज निर्मितीही सुरु झाली. या धरणास 5712.43 आकाराचे 5 सेवाद्वारे आहेत. त्याची विसर्ग क्षमता प्रत्येकी 8000 घफु/सेकंद प्रमाणे आहे.
राधानगरी धरणास 106 मीटर लांबीचा सांडवा असून 7 स्वयंचलित दरवाजे हे या राधानगरी धरणाचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. राधानगरी धरण प्रकल्पामध्ये 8362.16 द.ल.घ.फू. इतका पाणीसाठा होत असून त्यावर राधानगरी ते शिरोळपर्यंतच्या 14 कोल्हापुरी बंधार्याद्वारे 5 तालुक्यातील 91 गावांना सिंचनाचा लाभ होत आहे. या धरणाद्वारे 26560 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. राधानगरी धरणाच्या पाण्याचा लाभ राधानगरी ते शिरोळ यातील 5 तालुक्यांना होत आहे. या परिसरात तारळे, शिरगाव, राशिवडे, हाळदी, कोगे, कोगे (खाजगी), सिंगनागपूर, राजाराम, सुर्वे, रुकडी, रुई, इचलकरंजी, तेरवाड आणि शिरोळ असे 14 बंधारे आहेत. या कोल्हापूर पध्दतीच्या बंधार्याद्वारे परिसरातील शेतकर्यांना बारमाही पाणी मिळू लागले. ज्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात समृध्द शेतीचे वरदान लाभले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी राधानगरी धरणाबरोबरच कोल्हापुरी पध्दतीचे बंधारे, विहिरी, तलाव, छोटे बंधारे अशा अनेक योजनांचा धडाका लावला. राधानगरी धरण म्हणजे या प्रयत्नांच्या मालिकेतील मुकुटमणी आहे. संस्थानाच्या बचतीमधून इ.स. 1907 मध्ये महाराजांनी राधानगरी या धरणाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी धरणाची योजना पुढे आणली. 19 फेब्रुवारी 1908 ला गाव नव्याने वसवून त्या गावाचे नाव ‘राधानगरी’ ठेवण्यात आले. राधानगरी धरण हे कोल्हापूर जिल्ह्याची भाग्यरेखा ठरली आहे. कारण या धरणाच्या पाण्याचा लाभ राधानगरी ते शिरोळ यातील 5 तालुक्यांना होत आहे. तसेच भोगावती नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधार्याद्वारे परिसरातील शेतकर्यांना बारमाही पाणी मिळू लागले.