कोल्हापूर - राधानगरी धरण आज दुपारी 4 वाजता 95 टक्के भरले आहे. कोणत्याही क्षणी विसर्ग होण्याची शक्यता असून नदीकाठच्या गावातील लोकांनी सतर्क रहावे, असा दक्षतेचा इशारा पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
गेल्या चार दिवसांपासून कोल्हापुरात मुसळधार पाऊस सुरू आहे. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातसुद्धा धरणातील पाण्याने 50 टक्क्याचा आकडा पार केला नव्हता पण, चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. आज सायंकाळपर्यंत धरण 95 टक्के भरले असून पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास येत्या काही तासात राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरून धरणाचे स्वंयचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठी व सखल भागात राहणाऱ्या लोकांनी सतर्क रहावे, असा दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.