कोल्हापूर - राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या नेत्याला आव्हान देणे आणि हिम्मत असले तर माझ्या विरोधात लढ म्हणणे चुकीचे. शिवसेनेच्या विद्यमान आमदारांनी केलेली ही चूक कधीही विसरणार नाही. चंद्रकांत पाटील विरोधी पक्षातील असले तरी त्यांच्याप्रती आदर असल्याचे राधानगरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार के. पी. पाटील म्हणाले.
पाटील यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेचे उमेदवार प्रकाश आबीटकर आणि चंद्रकांत पाटील यांच्यामधील पूर्वीचा वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. दरम्यान, के. पी. पाटील आणि प्रकाश आबीटकर या दोन्हीही उमेदवारांनी मतदारसंघात प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे जनता नेमकी कोणाला कौल देणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे वाचलं का? - साताऱ्यात भर पावसात शरद पवार उदयनराजेंवर बरसले
राधानगरी विधानसभा मतदारसंघात एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे राहुल देसाई, काँग्रेसचे डोंगळे आणि सत्यजित जाधव यांनी बंडखोरी केली आहे. भाजपचे देसाई यांच्या बंडखोरीचा शिवसेनेच्या आबीटकर यांना, तर काँग्रेसचे डोंगळे आणि जाधव यांच्या बंडखोरीचा फटका के. पी. पाटील यांना बसणार का? याची चर्चा सुरू आहे. बहुरंगी लढत होणार असल्याने कोण किती मते घेणार? यावरच विजयाचे गणित अवलंबून असणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मेहुणे-पाहुणे यांच्या उमेदवारीच्या वादात हस्तक्षेप करून जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांना थांबण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे दोघेही आता एकत्र प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळे त्याचा फायदा सुद्धा के. पी. पाटील यांच्या पारड्यात पडणार आहे.