कोल्हापूर : जिल्ह्यातील वारणा साखर कारखान्याने अद्याप बिलाचा एकही हप्ता शेतकऱ्यांना दिलेला नाही. त्यामुळे, ज्या कारखानदारांनी अद्याप गतवर्षीचे उसाचे बिल दिले नाही. त्यांच्यावर कारवाई करत चालू वर्षाच्या ऊस गाळपाचा परवाना देऊ नये, अशा पद्धतीचे निवेदन प्रहार जनशक्तीच्या वतीने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना पुणे येथे देण्यात आले.
आज कोरोनाच्या महामारीमुळे शेतकरी हतबल झाला असताना कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा साखर कारखाना तसेच इतर दुसऱ्या कारखानदारांनीही शेतकऱ्यांची उसाची बिले वेळेत देणे गरजेचे होते. परंतु, त्यांना मदत करायची बाजूला ठेवून शेतकऱ्यांची बोटे शेतकऱ्यांच्याच डोळ्यात घालण्याचा कार्यक्रम कारखानदारांनी चालू केला आहे. ज्या कारखानदारांनी उसाची बिले दिली नाहीत त्यांनी ती व्याजासकट बिले द्यावीत, अशी मागणी प्रहार संघटना अखंड महाराष्ट्रभर करत आहे. जो कारखाना व्याजासकट थकित उसाची बिले देत नाही. त्यांचा गाळप परवाना रद्द करावा. अन्यथा प्रहार आक्रमक भूमिकेत न्याय मागेल, अशा मागणीचे निवेदन आयुक्त यांना देण्यात आले. यावेळी उपस्थित प्रहार संघटनेचे राज्य प्रवक्ते शंभूराज खलाटे. स्वप्नील पाटील, दिग्विजय पाटील, बंटी नांगरे पाटील, प्रणव चापेकर, धैर्यशील पाटील, अमोल कारंडे, सागर गावडे, किरण भांगे तसेच शेतकरी उपस्थित होते.