कोल्हापूर - जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी गावातील ग्रामपंचायतीने महावितरणचे ५६ लाख रुपये वीजबिल न भरल्याने वीजपुरवठा खंडीत केला आहे. मागील पंधरा दिवसापासून गावचा वीजपुरवठा खंडीत असल्यामुळे तीव्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे. पाण्याविना गावातील नागरिकांचे हाल होत असून दोन किलोमीटर वरून पाणी आणावे लागत आहे. सरकारने यावर काही तोडगा काढुन गावचा पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. याबाबतचे ईटीव्ही भारतचे विशेष वृत्त..
ग्रामपंचायतीकडे महावितरणचे ५६ लाखापेक्षा जास्त बिल थकीत -
वाडी रत्नागिरी गावाचा उदरनिर्वाह हा जोतिबा मंदिरावर चालतो. मात्र, गेली दीड वर्षापासून राज्यातील देवालये ही बंद आहेत. गावात दर्शनासाठी भक्त हे येत नाहीत. त्यामुळे गावातील व्यवसाय हे पूर्ण रितीने बंद आहेत. त्यामुळे गावातील कोणाच्याही हातात पैसे नाहीत. पैसा येण्याचे मार्ग बंद असल्यामुळे येथील ग्रामस्थांनी घरभाडे, वीज बिल भरणा केलेला नाही. यामुळे ग्रामपंचायतीकडे महावितरणचे ५६ लाख रुपये बिल भरायचे बाकी आहे. परिणामी महावितरणने कारवाई करत मागील पंधारा दिवसापासून गावातील वीज पुरवठा हा खंडीत केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कडून होणार पाणी उपसा केंद्र बंद झाल्याने गेल्या पंधरा दिवस गावात पाणी नाही. पाण्याविना लोकांचे हाल होत असून जवळपास एक ते दोन किलोमीटरवर पाण्यासाठी हेलपाटे होत आहेत. त्यामुळे यावर राज्य सरकारने तोडगा काढून पाणी पुरवठा पुर्ववत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
संपूर्ण गावाचा उदरनिर्वाह जोतिबा मंदिरावर -
गेल्या दीड वर्षांपासून मंदिरे बंद आहेत. मध्यंतरी मंदिरे सुरू झाली पण कोरोनामुळे पुन्हा मंदिरे करण्यात आली. वाडी रत्नागिरीतील सर्व कुटुंबे ही जोतिबा मंदिरावर अवलंबून आहेत. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून मंदिरे बंद असल्याने भाविक इकडे फिरकले नाहीत. त्यामुळे येथील कुटुबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. आर्थिक गणित बिघडल्याने ग्रामपंचायतचा सर्व कर भरण्यासाठी लोकांकडे पैसे नसल्याने ग्रामपंचायत देखील अडचणीत आले आहेत.
पंधरादिवसापासून पाण्यासाठी फरफट -
महावितरणने वीज पुरवठा खंडित केल्याने वाडी रत्नागिरी येथील पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पाण्यासाठी नागरिकांची फरफट सुरू आहे. नागरिकांनी ग्रामपंचायती मार्फत उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीतून उपसा सुरू आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने कोल्हापुरातून पाण्याच्या टँकरची सोय केली आहे. लोकप्रतिनिधींनी देखील वाडी रत्नागिरीला पाणी पुरवठा टँकरच्या माध्यमातून करण्यास सुरुवात केली आहे.
१५ व्या वित्त आयोगातून खर्च करण्याचे आदेश, मग ही वेळ का आली?
ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या पंधराव्या वित्त आयोगातील पैसे पाणी वीज बिल भरण्यासाठी अधिकार राज्य सरकार काही दिवसांपूर्वीच दिले आहेत. 15 व्या वित्त आयोगातून वाडी रत्नागिरीसाठी 36 लाखांचा निधी मिळाला होता. मात्र हा निधी इतर विकास कामांसाठी खर्च करण्यात आला. अशी माहिती ग्रामविकास अधिकारी जयसिंग बंधवडे यांनी दिली आहे.
देवस्थान समितीचे दोन लाख अद्याप नाहीत -
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून वाडी रत्नागिरीच्या ग्रामपंचायतीला दरवर्षी दोन लाख रुपये देण्याचे आदेश राज्य सरकारचे आहेत. मात्र अद्याप ग्रामपंचायतीला देवस्थान समितीकडून एक रुपया मिळालेला नाही. हे पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ग्राम विकास अधिकारी यांनी सांगितले.