कोल्हापूर - मोबाईल आणि गांजा प्रकरणावरून कळंबा कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे निघाले असताना आता कारागृहातील शिपायाच्या बुटांमध्ये अक्षेपार्ह चिठ्ठ्या आढळल्याने खळबळ माजली आहे. कारागृह कर्मचाऱ्यांची झडती घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून किसन असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. त्यामुळे पोलिसच कैद्यांना निरोपाच्या चिठ्ठ्या पाठवून मदत करत असल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण घटनेची वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली गेली आहे. संबंधित शिपायावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदुलकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
सापडलेल्या चिठ्ठीत नेमका मजकूर काय?
गेल्या महिन्यात कारागृहात सापडलेल्या मोबाईलचा पुरावा नष्ट करण्याचा ठपका एका पोलीस शिपायावर ठेवण्यात आला होता. त्यानंतर आता कारागृहातील आणखीन एका पोलिसाच्या सॉक्समध्ये कैद्याची चिठ्ठी सापडणे म्हणजे गंभीर बाब आहे. पोलीस शिपाई किसन यांच्याकडे सापडलेल्या चिठ्ठीवर 'माझे महत्वाचे काम आहे, मला पंचवीस हजार रुपये लागणार आहेत आणि चिठ्ठी घेऊन येणाऱ्याला पंचवीस हजार रुपये द्यावेत' असा मजकूर लिहिला आहे.
किसनचा यापूर्वीच्या काही प्रकरणांमध्ये हात -
कळंबा कारागृहात शिपायाच्या बुटाच्या बॉक्समध्ये कैद्यांना निरोपाची चिठ्ठी सापडल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. संबंधित शिपाई किसनची आता चौकशी सुद्धा सुरू करण्यात आली आहे. स्वतः कारागृह अधीक्षक चंद्रमनी इंदुलकर यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. किसनचा यापूर्वी सुद्धा अशा घटनांमध्ये सहभाग असल्याचे कारागृह अधीक्षकांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले. दरम्यान, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.