कोल्हापूर: या गंभीर घटनेनंतर पालकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित शिक्षकाची सातारा जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. घडलेल्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न शिक्षण संस्थेकडून करण्यात आला. मात्र आता संबंधित शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. जवळपास सात मुलींनी तक्रार केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील गावात इंग्रजी शिकवणारा शिक्षक नववी आणि दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवत होता. त्यातील काही मुलींसोबत त्याने गैरकृत्य केल्याची घटना घडली आहे.
मुलींना धमकी देण्याचे प्रकार : हा सर्व प्रकार गेल्या महिनाभरापासून सुरू होता. याबाबत संबंधित पीडित विद्यार्थिनींनी पालकांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी शाळेतील मुख्याध्यापकांना याबाबतची तक्रार केल्यानंतर संबंधित शिक्षक पुन्हा मुलींना धमकी देण्याचे प्रकार करू लागला. यामुळे मुख्याध्यापकांनी तातडीने येथील गावच्या पोलीस पाटलांना बोलवून घडलेल्या घटनेची माहिती दिली. मात्र यावेळी संबंधित शिक्षक हा शाळेत आलाच नाही. यामुळे गावकऱ्यांनी त्याची उचलबांगडी करण्याची मागणी केली. त्यानुसार संबंधित शिक्षकाचे सातारा जिल्ह्यात बदली करण्याचे आदेश मुख्याध्यापकांनी दिले. घडलेल्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र असे असले तरी संबंधित शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी येथील विद्यार्थिनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
मुलींच्या खिशात हात घालून गैरकृत्य: संबंधित शिक्षक हा शाळेतील नववी दहावीत शिकणाऱ्या वीस ते पंचवीस मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवतो. त्यांच्या खांद्यावर हात टाकतो, खिशात हात घालत असल्याची तक्रार विद्यार्थिनींनी केली होती. आलेल्या तक्रारीनुसार त्वरित मुख्याध्यापकांना सदर शिक्षकाचे बदली करण्याचे आदेश दिले. यापुढे संबंधित शिक्षकावर कडक कारवाई करू, असे गावच्या पोलीस पाटलांनी म्हटले आहे. आज शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.
घडलेला प्रकार निंदनीय : या शाळेत घडलेला प्रकार हा अतिशय निंदनीय असून समुपदेशन करण्यासाठी आले. यावेळी मुलींनी हा प्रकार मला सांगितला. सध्या या शिक्षकाची दुसऱ्या जिल्ह्यात बदली झाली. तरी तेथील मुलींना देखील हा अशाच प्रकारचा त्रास देईल, याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या शिक्षकावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे, शिवाय त्याला निलंबन करण्याची सुद्धा गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या गीता हसूरकर यांनी म्हटले आहे.