कोल्हापूर - पोलंडचे भारतातील राजदूत अॅडम बुरक्वोस्की आणि त्यांची टीम आज कोल्हापुरात आली आहे. दुसऱ्या महायुद्धावेळी पोलंडच्या निर्वासितांना कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांनी आश्रय दिला होता.. या घटनेला आता ८० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी पोलंडच्या राष्ट्रपतींना कोल्हापूर भेटीचे निमंत्रण दिले होते. त्याचाच एक भाग म्हणून हे पथक आज कोल्हापुरात आले आहे.
'आपका दिल हमारे लिये खुला था, और हमारा दिल भी आपले लिये हमेशा खुला रहेगा' अशी कृतज्ञता बुरक्वोस्की यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी कोल्हापूर-पोलंड स्नेहबंधाच्या आठवणींना उजाळा देत आपले नाते अजूनही घट्ट बनेल, असेही म्हटले. यावेळी त्यांनी भारतीय संस्कृतीचे कौतुक करत दोन्ही देशातील संस्कृती आणि शिक्षणाची देवाण-घेवाण होणे गरजेचे असून, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
जगातील अनेक देशांनी निर्वासित पोलंडवासीयांसाठी आश्रयाचे दरवाजे बंद केले असताना, भारतातील दोन संस्थानांनी मात्र, पोलंडवासीयांना आपल्या पदरात घेतले होते. ही संस्थाने म्हणजे कोल्हापूर आणि जामनगर. या घटनेला आता ८० वर्षे पूर्ण होत आहेत. इतक्या वर्षांनंतरही कोल्हापूर आणि पोलंडवासीयांचे दृढ संबंध आहेत. याच संबंधांना उजाळा देण्यासाठी पोलंडचे राजदूत आपल्या पथकासह कोल्हापुरात आले आहेत.
दोन देशांमधील आठवणी सांगणाऱ्या महावीर गार्डन येथील स्मृती स्तंभाला पोलंडच्या या पथकाने आदरांजली वाहिली. दरम्यान, कोल्हापूर आणि पोलंडमधील नाते अधिक दृढ होण्यासाठी पोलंडचे राष्ट्राध्यक्ष कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत या पार्श्वभूमीवर त्यांच्या राजदूतांचा कोल्हापूर दौरा महत्त्वाचा ठरला आहे.