कोल्हापूर - पतीने घेतलेल्या कर्जमाफीचे आमिष दाखवून शहरातील रूईकर परिसरातील एका सावकाराने नवविवाहित तरुणीवर बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. हरीश स्वामी (२२, रुईकर कॉलनी, कोल्हापूर) असे आरोपी सावकाराचे नाव आहे. संबंधित नवविवाहित तरुणीने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे.
हरीशने आपल्या २ साथीदाराच्या मदतीने पीडित तरुणीला अमानुष मारहाण करून, शरीरावर सिगारेटचे चटके दिले आहेत. या तिघा नराधमांवर कोल्हापूरच्या शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आशिष पाटील (२८, रा. सायबर चौक, राजारामपुरी), सदाम मुल्ला (२९, यादवनगर, कोल्हापूर), अशी हरीशच्या साथीदारांची नावे असून हे तिघेही फरार आहेत. या प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
पीडित तरुणीचा पुण्यातील तरुणाशी ६ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. घरातून विरोध झाल्याने दाम्पत्याने कोल्हापुरात भाड्याने खोली घेतली. संसारोपयोगी खर्चासाठी दाम्पत्याला पैशांची गरज भासली. पतीने रूईकर कॉलनीतील संशयिताकडून ३० हजार रुपयांचे कर्ज घेतले. व्याजाचे तीन हप्त्याचे साडेदहा हजार रुपये परत केल्यानंतर पुढील रक्कम देण्यास दाम्पत्यासमोर अडचणी निर्माण झाल्या. सावकारी कर्ज वसुलीच्या निमित्ताने संशयित दाम्पत्याच्या घरी सतत येऊ लागला. त्याने या दोघा पती-पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण करणे, असे प्रकार सुरू केले. त्यानंतर महिन्यापूर्वी रात्रीच्या सुमाराला संशयित महिलेच्या घरी आला. त्याने तिला घरातून बाहेर बोलावून घेतले. त्याने पतीची चौकशी केली. पती कामावर गेल्याचे समजताच सावकाराने महत्त्वाचे काम आहे, असे सांगून तिला मोटारीतून कळंबा रोडवर नेले. तेथे बीअर पिऊन त्याने चारचाकीत पीडितेवर बलात्कार केला. त्यानंतरही या सावकराने धमकावू ३ते४ वेळा लैंगिक अत्याचार केल्याचे तरुणीने जबाबात म्हटले आहे.
या घटनेनंतर सावकारासह त्याच्या साथीदाराकडून होणार्या त्रासाला वैतागलेल्या तरुणीसह पतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्यवाहक गीता हसूरकर, मंगल पवार यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडे आपबिती सांगितली. यानंतर हसूरकर, पवार यांनी पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांना घटनेची माहिती देताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, आरोपींना गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाताच ते पसार झाले.
घटनेतील आरोपींना लवकरात लवकर अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांना देण्यात आले आहेत, असे पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी यांनी सांगितले. मात्र, या घटनेमुळे पुरोगामी कोल्हापूर कुठे नेऊन ठेवले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे या ३ आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.