कोल्हापूर - गावबंदीसाठी रस्त्यावर लावलेले बॅरिकेट्स काढण्यासाठी कोल्हापुरातील पोलीस पाटलांवर हल्ला झाल्याचा प्रकार घडला आहे. आजरा तालुक्यातील साळगाव गावात ही घटना घडली आहे. गावातीलच संभाजी गावडे याने पोलीस पाटीलांच्या डोक्यात दगड घातला असून यामध्ये पोलीस पाटील सूर्यकांत पाटील जखमी झाले आहेत. संबंधित व्यक्तीवर आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे.
लॉकडाऊनचे आदेश दिल्यानंतर साळगावमधील पोलीस पाटील आणि तयार केलेल्या दक्षता समितीने गावातून कोणीही व्यक्ती बाहेर जाऊ नये आणि बाहेरून कोणी गावात येऊ नये यासाठी गावात येणारे सर्व रस्ते बंद केले होते. खूप चांगल्या पद्धतीने समितीने गावात लोकांमध्ये जनजागृती करून दक्षता घेतली होती. मात्र, गावातील संभाजी गावडे याने बाहेर जाण्यासाठी रस्त्यावर लावलेले बॅरिकेट्स काढण्याची मागणी केली. मात्र, प्रशासनाकडुन तसे आदेश मिळाल्याने काढता येणार नसल्याचे सांगत पोलीस पाटील सूर्यकांत पाटील यांनी विरोध केला. त्यामुळे संभाजी गावडे यांनी पोलीस पाटील यांच्यावर हल्ला केल्याची माहिती मिळत आहे.