कोल्हापूर - महापुरामुळे रस्ते बंद झाले आहेत. मालवाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मालवाहतूकीची सेवा बजावणारे ट्रकचालक गेले 3 दिवस रस्त्यावरच अडकून आहेत. या संकटात कोल्हापूरकर मात्र या सर्वांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. महामार्गावर अडकलेल्या या वाहनचालकांना स्थानिकांकडून अन्न आणि पाणी दिले जात आहे. एकीकडे कोल्हापूरकर स्वतः मोठ्या अस्मानी संकटाशी सामना करत असताना दुसरीकडे मात्र अडचणीत सापडलेल्या नागरिकांच्या मदतीला धावून आले आहेत.
महामार्गावरील पेट्रोल पंप, एमआयडीसी भागात ट्रक चालक -
गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापुरातल्या शिरोली महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने महामार्ग बंद आहे. त्यामुळे पुण्याहून कोल्हापूर आणि बेंगलोरकडे जाणारी वाहने शिरोलीच्या पलीकडेच अडकून आहेत. तर बेंगलोरवरून पुण्याकडे जाणारी वाहतूक कोल्हापूरातील महामार्गावरच बंद झाली आहे. महामार्गावरच एका बाजूला ट्रक चालकांनी आपले ट्रक लावले असून तीन दिवसंपासून ते सर्वजण इथे अडकून आहेत. त्यामुळे शेकडो वाहनांच्या रांगा महामार्गावर पहायला मिळत आहेत. पहिल्या दिवशी काही प्रमाणात अनेकांना त्रास झाला. मात्र, हे समजतात कोल्हापूरातल्या अनेक सामाजिक संस्था, कार्यकर्त्यांसह व्यावसायिकांनी समोर येऊन या सर्वांना तीन दिवसांपासून अन्न आणि पाणी बिस्कीट तसेच फळांचे वाटप करत आहेत. कोणीही उपाशी राहू नये, या हेतूने सर्वांना फूड पॅकेट्स दिले जात आहेत.
कोल्हापूरकरांचे ट्रक चालकांनी मानले आभार -
महामार्गावर अडकून थांबलेल्या ड्रायव्हर व क्लीनर बांधवांना गेल्या 3 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात फूट पॅकेट्स दिले जात आहेत. अनेकांकडून मदत मिळत असल्याने काही ट्रक चालक तसेच प्रवाशांनी 'आम्ही खाऊन थकलो, इतकी मदत कोल्हापूरकारांनी दिली' अशा भावनासुद्धा व्यक्त केल्या आहेत.