कोल्हापूर - जुलै महिना सुरू होताच सर्व शिवप्रेमींना उत्कंठा लागून राहिली असते ती म्हणजे पन्हाळा-पावनखिंड या रणसंग्राम मोहिमेची. मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाही ही मोहीम रद्द करण्यात आली आहे. जवळपास शंभराहून अधिक संस्था या मोहिमेचे जुलै महिन्यात आयोजन करत असतात. या मोहिमेत हजारो गिर्यारोहक शिवप्रेमी सहभागी होत असतात, मात्र वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम रद्द करण्याचा निर्णय सर्व संस्थांनी घेतला आहे.
घोडखिंडीतील स्मृतीला उजाळा -
किल्ले पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटून छत्रपती शिवाजी महाराज हे विशाळगडकडे रवाना झाले. यावेळी बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे, विठोजी काटे यांच्यासह निवडक मावळ्यांना घोडखिंडीत शत्रु सैन्याशी युद्ध झाले. जवळपास 300 पेक्षा अधिक मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती देत घोडखिंडीला पावन केले. या स्मृतीला उजाळा देण्यासाठी दरवर्षी हजारो शिवप्रेमी जुलै महिन्यात पन्हाळा ते पावनखिंड मोहीम करून अभिवादन करतात.
पावन खिंडीत प्रतिकात्मक पूजन -
जवळपास शंभरापेक्षा अधिक संस्था या मोहिमेचे आयोजन करून यात हजारो शिवप्रेमी गिर्यारोहक प्रेमी सहभागी होत असतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी ही मोहीम रद्द करण्यात आली होती. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही ही मोहीम रद्द करण्याचा निर्णय या सर्व संस्थांनी घेतला आहे. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट मौंटेनीरिंग असोसिएशनच्या मध्यवर्ती समन्वय समितीतर्फे हा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी परवानगी दिल्यास मोजक्याच पदाधिकार्यांना घेऊन पावन खिंडीत प्रतिकात्मक पूजन करण्यात येईल, असे दुर्ग अभ्यासक अमर अडके यांनी सांगितले.
नागरिकांचा सुरक्षिततेसाठी निर्णय -
गतवर्षी कोरोनामुळे मोहीम रद्द करावी लागली होती. असोसिएशनशी संलग्न 74 संघटनेने त्यास प्रतिसाद देत मोहीम स्थगित केल्या होत्या. दरवर्षी पन्नास हजारापेक्षा जास्त मोहीमवीर सहभागी होत असतात. यंदा ही मोहीम रद्द केली आहे. यंदा या दिनी काही संस्था संघटना विविध कार्यक्रम राबवणार आहेत. तसेच विविध माध्यमांद्वारे पन्हाळा ते पावनखिंड या रणसंग्रामावर आधारित जगभरातल्या शिवप्रेमींना माहितीपट दाखवला जाणार आहे. अशी माहितीही यावेळी डॉ.आडके यांनी दिली. पन्हाळा ते पावनखिंड या मार्गावर सोहळ्या वाड्या-वस्त्या येतात. आपल्यामुळे वाड्या-वस्त्यावरील नागरिकांचा जीव धोक्यात येऊ नये, यासाठी सर्व संघटनांनी हा निर्णय घेतला आहे. असे यावेळी त्यांनी सांगितले.