कोल्हापूर - गेल्या 24 तासापेक्षा अधिक काळ सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीने गुरुवारी मध्यरात्री धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे कोल्हापूरला महापुराचा धोका अगदी गडद झाला आहे. त्यामुळे प्रयाग चिखली गावात एनडीआरएफकडून रात्रभर मदत कार्य सुरू आहे.
प्रयाग चिखली गावातील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे काम सुरू आहे. कोल्हापूर शहरात देखील शाहूपुरी, व्हीनस कॉर्नर, सुतार मळा आदीभागात पाणी साचायला सुरवात झाली आहे.
हेही वाचा-वाईतील देवरुखकर वाडी वस्तीवर कोसळली दरड ; पाच जण अडकले
२०१९ साली आलेल्या महापुराच्या अनुभवावरून येणार धोका लक्षात घेत एनडीआरएफचे दोन पथक कोल्हापूरात दाखल झाले आहे. सायंकाळी (22 जुलै) चार वाजल्यापासून एक पथक प्रयाग चिखली येथे तैनात केले आहे. पुराचे पाणी वाढत असल्याने नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, यासाठी घरोघर फिरून बाहेर पडण्याचे आवाहन एनडीआरएफच्या जवानांनी केले. नागरिकांनी सहकार्य करत जनावरांसह कौटुंबिक साहित्य घेत बाहेर पडले. पावसाचा जोर सुरू राहिल्याने चिखली गावात पाणी वाढायला सुरवात झाल्यानंतर एनडीआरएफने रात्रभर गाव खाली करण्याचे काम हाती घेतले आहे. मध्यरात्रीपर्यंत ५० टक्के गाव खाली करण्यात एनडीआरएफ जवानांना यश आले.
हेही वाचा-ज्योतिर्लिंग भीमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा; इतिहासात पहिल्यांदाच शिवलिंग पाण्याखाली!
नूतन जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचा रात्रभर पहारा
तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची बदली झाल्यानंतर त्याठिकाणी राहुल रेखावार यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हातात घेतली. केवळ पदभार घेऊन १० दिवस उलटाच जिल्ह्यात महापुराचा धोका निर्माण झाला. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. प्रत्येक तासाला जिल्ह्यातील पावसाची अपडेट घेत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना करत आहेत. पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडताच रात्रभर परिस्थितीचा आढावा घेत होते. मध्यरात्री त्यांनी राजाराम बांधरा, आंबेवाडी, प्रयाग चिखली या भागातील आढावा घेत काही भागात भेट दिली.
हेही वाचा-पोर्नोग्राफिक प्रकरण: राज कुंद्राने दीड वर्षात बनवले शंभर पॉर्न सिनेमा ?
शहरात पाणी साचायला सुरवात-
पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली असताना कोल्हापूर शहरात पाणी साचायला सुरवात झाली आहे. शहरात असणाऱ्या जयंती नाल्याच्या माध्यमातून हे पाणी आता शाहूपुरी कुंभार गल्ली, व्हीनस कॉर्नर, सुतार मळा इत्यादी भागात पाणी साचले आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे रात्रीच स्थलांतर केले आहे.