कोल्हापूर - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यानंतर राज्यभर त्याचे संतप्त पडसाद उमटत आहे. कोल्हापुरात देखील मराठा समाजाचे नेते संतप्त झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावरची लढाई केलीच, आता न्यायालयीन लढाईसाठी अधिक बळकट होण्याची गरज आहे. त्यासाठी रविवारी कोल्हापुरात न्यायिक परिषद पार पडणार आहे. परिषदेची तयारी पूर्ण झाली असून या न्यायिक परिषदेत 6 जिल्ह्यातील प्रमुख वकील आणि मराठा समाजाचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
मराठा आरक्षणासाठीच्या लढ्याचे केंद्र आता कोल्हापूर झाले आहे. कोल्हापुरातून या आरक्षणाच्या प्रश्नावर संपूर्ण महाराष्ट्रात आवाज उठवण्यासाठी व न्यायिक विचारविनिमय करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्यावतीने रविवारी सकाळी साडे दहा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत न्यायिक परिषद आयोजित करण्यात आली आहे.
या परिषदेची तयारी पूर्ण झाली असून सर्वांचे याकडे लक्ष लागून राहिले आहे. मराठा आरक्षणासाठी आयोजित या न्यायिक परिषदेला मुंबई उच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ श्रीराम पिंगळे, अॅड. आशिष गायकवाड, राजेंद्र दाते-पाटील, नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात आणि राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती उपस्थित राहणार आहेत. न्यायिक परिषदेच्या अंतिम तयारीच्या पाहणीसाठी प्रा.जयंत पाटील, जयेश कदम, अॅड. बाबा इंदुलकर, अॅड. गुरुप्रसाद माळकर, दिलीप देसाई आदी उपस्थित होते.