कोल्हापूर - सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केल्याने राज्य सरकार बद्दल मराठा समाजात असंतोष पसरला आहे. सुप्रीम कोर्टात समर्थपणे बाजू मांडली नसल्याचा आरोप मराठा समाजाने केला आहे. कोल्हापुरात दसरा चौकात बुधवारी राज्य सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत समाजाने शांततेने संयम राखत मुक मोर्चे काढले. मात्र राज्य सरकारने मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असून इथून पुढे मराठा समाजाचा उद्रेक पाहावा लागेल असा इशारा कोल्हापुरातील मराठा समाजाने दिला आहे.
सुप्रीम कोर्टाने बुधवारी मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला. त्यामुळे मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. तर राज्य सरकार सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू मांडण्यात असमर्थ ठरले असल्याचा आरोप मराठा समाजाकडून केला जात आहे. राज्य सरकारच्या या नाकर्ते भूमिकेच्या निषेधासाठी बुधवारी कोल्हापुरात मराठा समाजाच्या वतीने दसरा चौक येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. सुप्रीम कोर्टातील आरक्षण टिकविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील नसल्यानेच कोर्टाचा हा निकाल ऐकावा लागला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.
आता मराठा समाजाचा उद्रेक पाहायला - सचिन तोडकर
मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी 55 मूक मोर्चे शांततेत आणि संयमाने काढले. मात्र याचा विसर राजकीय नेत्यांना पडला आहे. मराठा समाजाने नेहमीच प्रशासनाला सहकार्याची भूमिका घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळे राज्य सरकारच्या विरोधात तीव्र संताप आहे. ज्या पद्धतीने मराठा समाजाचा संयम आणि शांतता पाहिली त्याप्रमाणे आता मराठा समाजाचा उद्रेक पाहावा असा इशारा सचिन तोडकर यांनी दिला.