कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात आता भक्तांना दर्शन घेतल्यानंतर वृक्ष प्रसाद मिळणार ( Ambabai Devotee Will Get Plant As Parasad ) आहे. सुप्रसिद्ध अभिनेते मनोज वाजपेयी आणि सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी हा लोकार्पण सोहळा पार पडला. ( Manoj Vajpayee And Sayaji Shinde Launch Scheme ) भक्तांनी हा वृक्षप्रसाद स्वीकारून आपल्या घरोघरी आई अंबाबाईचा आशीर्वाद म्हणून एक वृक्ष रोपण करावं आणि निसर्ग रक्षणासाठी योगदान द्यावे या मुख्य हेतूतून ही योजना सुरू केली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आणि सह्याद्री देवराई यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.
भाविक श्रद्धायुक्त भावनेने झाडे लावतील : स्थानिक देशी झाडे मोठ्या प्रमाणात लोकांनी लावावीत, त्याची उपयुक्तता समजावी यासाठी कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिरामध्ये वृक्षप्रसाद योजनेच्या अंतर्गत भाविकांना झाडाच्या स्वरूपात प्रसाद म्हणून कलशामध्ये रोप देण्यात येणार आहे. उपक्रम देवस्थान व्यवस्थापन समिती, सामाजिक वनीकरण विभाग कोल्हापूर आणि देवराई यांच्या संयुक्तपणे राबविण्यात येणार आहे. यामध्ये पारिजात, तुळस, लिंबू, माळुंग, बेल इत्यादी ही देशी उपयुक्त झाडे देण्यात येणार आहेत. या उपक्रमातून स्थानिक देशी उपयुक्त झाडांचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात होईल. भाविक रोपे आपल्या अंगणात, टेरेसवर, कुंडीमध्ये, शेताच्या बांधावर श्रद्धायुक्त भावनेने लावतील हा या उपक्रमाचा हेतू आहे.
![Ambabai Temple](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-kop-02-ambabai-temple-vrukshaprasad-2022-7204450_02122022154139_0212f_1669975899_598.jpg)
अभिनेते मनोज वाजपेयी ध्यानस्थ - देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर आणि सह्याद्री देवराई यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर येथे सुप्रसिद्ध अभिनेते मनोज वाजपेयी आणि सयाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शुक्रवार सायंकाळी वृक्षप्रसाद योजनेचा लोकार्पण सोहळा मंदिरामध्ये पार पडला. यावेळी सुप्रसिद्ध अभिनेते मनोज वाजपेयी यांनी अंबाबाई मंदिरात ध्यान केले.