कोल्हापूर - गावाला रस्ता नसल्याने एका गर्भवती महिलेला उपचाराअभावी आपला जीव गमावाला लागला आहे. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात घडली. भागुबाई राजाराम भुरके असे मृत महिलेचे नाव आहे.
राधानगरी तालुक्यात, म्हासुर्ली पैकी मधला धनगरवाडा नावाचे, कमी लोकवस्ती असलेले गाव आहे. या गावात जाण्यासाठी रस्ताच नाही. याकडे अनेकदा लोकांनी लक्ष वेधलं तरीदेखील प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. या गावात राहणाऱ्या भागुबाई भुरके यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी तिच्या कुटुंबियांनी धडपड सुरू केली. मात्र मधला धनगरवाडा ते म्हासुर्ली असे 7 किलोमीटर अंतर कसे कापायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यांनी अखेर झोळी करत हे अंतर कापण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला. रुग्णालयात दाखल होण्याआधीच भागुबाई यांनी अखेरचा श्वास घेतला.
दरम्यान, यापूर्वीही वेळेत उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याच्या घटना या गावात घडल्या आहेत. मात्र प्रशासनाने आजपर्यंत गावाकडे लक्ष दिले नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे गावकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
ऑगस्ट महिन्यामध्ये सर्पदंश झालेल्या व्यक्तीचा सुद्धा असाच मृत्यू -
ऑगस्ट महिन्यात सुद्धा अशाच पद्धतीने म्हासुर्ली पैकी मधला धनगरवाडा येथील सुनिल गंगाराम घुरके यांचा सर्प दंश झाल्यानंतर उपचारास दिरंगाई मुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे नेहमीच अशा घटना घडत असल्याने ग्रामस्थांकडून सुद्धा संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा - कोल्हापूर महापालिकेतील बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा; २२ जणांना नोटिसा
हेही वाचा - सदाभाऊंनी काय साध्य केलं; पहा ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट