कोल्हापूर - कोल्हापूर उत्तर या विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून कोल्हापूर उत्तर या मतदारसंघातून काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव हे २०१९ च्या निवडणुकीत विजयी झाले होते. मात्र १ डिसेंबर रोजी आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाले. त्यामुळे ही जागा रिक्त झाली असून या रिक्त जागेसाठी आता पोटनिवडणूक होणार आहे.
शनिवारी निवडणूक आयोगाकडून तारीख जाहीर करण्यात आली असून १२ एप्रिल २०२२ रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे आता कोल्हापूर उत्तर मतदार संघात आचार संहिता लागू झाली असून या निवडणुकीच्या रिंगणात अनेकजण उतरणार असल्याची चर्चा रंगत आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणुक अधिकारी राहुल रेखावर यांनी पत्रकार परिषद घेत मतदार संघ आणि मतदारांची संख्या आणि निवडणुकीबाबत चे नियम सांगितले आहे. उमेदवाराच्या प्रचारास किंवा रॅलीस १००० पेक्षा जास्त कार्यकर्ते येणार असतील तर त्या उमेदवारास रीतसर निवडणूक अधिकाऱ्यांकडे परवानगी घ्यावी लागणार आहे अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. तसेच ज्यांचे वय 18 वर्ष पूर्ण आहेत अशांनी मतदानासाठी अर्ज करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
पुढीलप्रमाणे निवडणूक कार्यक्रम आखण्यात आले आहे.
- अधिसूचना - गुरुवार १७ मार्च २०२२
- नामनिर्देशनाचा अखेरचा दिवस - गुरुवार २४ मार्च २०२२
- अर्ज छाननी - शुक्रवार २५ मार्च २०२२
- अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस - सोमवार २८ मार्च २०२२
- मतदान - मंगळवार १२ एप्रिल २०२२
- मतमोजणी - शनिवार १६ एप्रिल २०२२
भारत सरकारच्या निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाले त्यावेळेपासूनच म्हणजे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यानी सांगितले आहे. तर या निवडणुकीसाठी दिनांक 5 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादी निवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहे तर नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख ही 24 मार्च असून या तारखेपर्यंत जे निवडणुकीचे अर्ज भरतील त्यांचेच अर्ज ग्राह्य धरण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
अशी आहे मतदारांची आकडेवारी
उत्तर विधानसभा मतदार संघात एकूण 2 लाख 91 हजार 583 मतदार आहेत. त्यापैकी 1 लाख 45 हजार 656 हे पुरुष मतदार तर 1 लाख 45 हजार 915 स्त्री मतदार आहेत. तसेच 80 वर्षांपेक्षा जास्त वयाचे 11 हजार 275 मतदार आहेत. तर सैन्य दलातील मतदाराची संख्या ही 95 इतकी आहे. ज्या उमेदवारांना प्रचार व सभा आणि रॅली मध्ये एक हजार पेक्षा जास्त नागरिक सहभागी होणार असतील अशाने निवडणूक अधिकारी यांच्याकडून रीतसर परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे ही निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले आहे.