कोल्हापूर : राष्ट्रीय तपास यंत्रणेने देशभरातील 14 ठिकाणी आणि राज्यात कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यात छापेमारी केली आहे. कोल्हापुरातील इचलकरंजी, हुपरी परिसरातील तिघांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
सुरक्षेतेचा आढावा घेण्यात आला : दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यामध्ये दहशतवाद्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, जिल्ह्यातही चांदोली धरणासह अन्य संवेदनशील ठिकाणी रेकी झाल्याची कबुली त्यांनी दिली होती. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा पोलीस दल अलर्ट झाले होते. 10 ऑगस्ट रोजी पोलीस दलाकडून मॉकड्रिल घेण्यात आली होती. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर, जिल्ह्यातील मोठी धरणे या स्थळांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे. सात जून रोजी कोल्हापुरात झालेल्या धार्मिक दंगलीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आरपीएफ पोलीस तैनात करण्यात आले आहेत अशी माहिती, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.
सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या सलग सुट्ट्या, अधिक मास, श्रावण महिना यामुळे कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मंदिरात प्रवेश करणाऱ्या भाविकांची कसून तपासणी करूनच मंदिरात प्रवेश दिला जात आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणांनी जिल्ह्यात केलेल्या छापेमारीनंतर कोल्हापूर जिल्हा पोलीस दल सतर्क झाले आहे. तसेच गतवर्षी जुलै अखेरीस कोल्हापूरमध्ये एनआयएने अशीच एक कारवाई केली होती. नागरिकांनीही संशयास्पद हालचाली जाणवल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्याला याबाबत माहिती द्यावी असे आवाहन, पोलीस अधीक्षक पंडित यांनी यावेळी केले आहे.
हेही वाचा -