कोल्हापूर : नवोदय विद्यालय ( Navodaya Vidyalaya ) समितीने जिल्हा बंदीची अट रद्द करावी. तसेच 2021-22 या शैक्षणिक वर्षांमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. ज्यांना प्रवेश नाकारला गेला होता अशा सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश द्याव, या मागणीसाठी आज संभाजी ब्रिगेडच्या ( Sambhaji Brigade Movement ) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर Demonstrations of Sambhaji Brigade in Kolhapur ) आंदोलन करण्यात आले. शिवाय याबाबत निर्णय न झाल्यास विद्यार्थी उपोषणाला बसतील असा इशारा सुद्धा देण्यात आला.
संभाजी ब्रिगेडने दिलेल्या निवेदनात नेमकं काय म्हंटले आहे ? नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी हजारो विद्यार्थी प्रयत्न करीत असतात. इयत्ता सहावी पासून नवोदय साठी प्रवेश मिळतो. नवोदय विद्यालय प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थी पहिलीच्या इयत्तेपासूनच प्रयत्न करीत असतात. नवोदय विद्यालय साठी पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया नोव्हेंबर महिन्यापासूनच सुरू होते. एप्रिल महिन्यात लेखी परीक्षा झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांची अंतिम प्रवेश निश्चित झाल्याची यादी प्रसिद्ध केली जाते. 2021/22 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशा संबंधी देखील वरील प्रमाणे प्रक्रिया राबवण्यात आली. अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली. प्रत्यक्ष विद्यालयामध्ये प्रवेश देण्याच्या वेळी नवोदय विद्यालय समितीने जिल्हा बंदीची अट दाखवून अंतिम प्रवेशातील विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारले.
नवोदय समितीच्या बेकायदेशीर आदेशाचा संभाजी ब्रिगेडकडून निषेध : वरील कारणांनी प्रवेश नाकारला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा गांभीर्याने विचार करावा. कोरोना नंतर या विद्यार्थ्यांनी जोमाने प्रयत्न करून नवोदय विद्यालय परीक्षेमध्ये अपेक्षित यश मिळवले. असे असून देखील या विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारला गेला. या चिमुकल्यांचे शैक्षणिक वर्ष वाया घालवण्याचे महापाप नवोदय विद्यालय समितीने केलेली आहे. बरेच पालक नोकरी व्यवसाय निमित्त विविध जिल्ह्यांमध्ये रहिवास करत असतात काहीजण शिक्षणासाठी इतर जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेत असतात. अशा विद्यार्थ्यांच्या पालकांचा कायम रहिवासी पुरावा ज्या जिल्ह्यातील असेल त्याच जिल्ह्यात नवोदयसाठी अर्ज करावेत. अशा पद्धतीचा देशातील समानतेचा ऱ्हास करणाऱ्या, शिक्षणाचा मूलभूत हक्क नाकारणाऱ्या नवोदय विद्यालय समितीच्या या बेकायदेशीर आदेशाचा आम्ही निषेध करतो. कारण सीईटी, नीट, जेईई व तत्सम सर्व प्रकारच्या पात्रता परीक्षेसाठी कुठेही जिल्हा बंदी किंवा राज्य बंदी हा नियम किंवा अट लागू नाही. या परीक्षा सर्व देशभर समान पातळीवर होतात. प्रवेश देखील देशात कुठेही मिळतो. भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार शिक्षण मिळण्याच्या हक्काला वरील प्रकारे कोणतीही बंधने घालता येणार नाहीत. असे असताना केंद्रीय नवोदय विद्यालयाने आपल्या मनमर्जीप्रमाणे आदेश काढून संविधानातील मूल्यांना पायदळी तुडवण्याचे काम केले आहे असेही संभाजी ब्रिगेडने म्हंटले आहे.
तर विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संविधानिक मार्गाने उपोषण करतील : नवोदय विद्यालय समितीने जिल्हा बंदीची अट रद्द करावी. तसेच 2021-22 या शैक्षणिक वर्षांमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. ज्यांना प्रवेश नाकारला गेला होता अशा सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ नवोदय विद्यालय मध्ये प्रवेश द्यावा. नवोदय विद्यालय समितीने या गोष्टींचा गांभीर्याने विचार, केल्यास सदर विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे शिक्षणाच्या हक्कासाठी संविधानिक मार्गाने उपोषण करतील असा इशारा जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी यावेळी दिला. यावेळी अभिजित कांजर, विक्रमसिंह घोरपडे, रणजित देवणे, सचिन चौगुले, धनंजय मोरबाळे, अनिल पाटील, निकिता माने, शर्वरी माणगावे, राज भोगम, सचिन देसाई, महेश भालकर, सुरेश पाटील, ज्ञानेश्वर जाधव, राहुल अदिगरे उपस्थित होते.