कोल्हापूर- देशभर सर्वत्र बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी होत असताना, कोल्हापुरातील मुस्लीम बांधवांनी ईदवर होणारा खर्च पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुस्लीम बांधवांनी साध्या पद्धतीने ईद साजरी करत महापूर लवकर ओसरावा आणि रोगराई पसरू नये, यासाठी प्रार्थना केली.
पश्चिम महाराष्ट्रातील २ मुख्य जिल्ह्यावर आजपर्यंतचे सर्वात मोठे संकट कोसळले असून हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत येथील मुस्लीम बांधवांनी मानवतेचे दर्शन घडवले आहे. जिल्ह्यात आठ लाख मुस्लिम बांधवांनी कुर्बानीची रक्कम पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला आहे. सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यात पुराने थैमान घातले असून यामध्ये अनेकांची घरे अक्षरशः पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेली आहेत.
गेल्या ७ दिवसांपासून एका मुस्लीम बोर्डिंगमध्ये पूरग्रस्तांसाठी राहण्याची सोय करण्यात आली आहे. या सर्वांनाच लागेल त्या गोष्टीची मदत मुस्लीम बांधव करत आहेत. कोल्हापुरात आजपर्यंत नेहमीच मुस्लीम बांधव कोणत्याही दुर्घटनेवेळी पुढे आल्याचे पाहायला मिळाले आहे आणि आता महापुरासारखे मोठे अस्मानी संकट असताना ईद साजरा करणे मानवतेच्या विरोधात असल्याचे ते सांगत होते.