कोल्हापूर - सध्या शिवसेनेच्या एकाच उमेदवाराबरोबर माझी लढाई आहे. सात तारखेनंतर ठरणाऱ्या उमेदवाराबद्दल काय बोलणार? असा खोचक टोला हसन मुश्रीफ यांनी समरजितसिंह घाटगेंना दिला आहे. राजकीय विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या कागलमध्ये गुरूवारी तीनही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी शक्तिप्रदर्शन करत कागल मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शहरातील शिवाजी चौकामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. कागल मतदारसंघात अपक्ष उमेदवार समरजितसिंह घाटगेंनी सलग चार वेळा आमदार राहिलेल्या हसन मुश्रीफ यांना आव्हान दिले आहे.
हेही वाचा - प्रदुषणमुक्तीचा संदेश देत कोल्हापुरात ऋतुराज पाटीलांनी सायकलवरून भरला उमेदवारी अर्ज
मागील चार वर्षापासून समरजितसिंह घाटगे यांना भाजपकडून या मतदारसंघासाठी तयार केले जात आहे. मात्र, हा मतदारसंघ पहिल्यापासून शिवसेनेकडे आहे. तो आपल्याकडे घेण्यात भाजपला अपयश आले. त्यामुळे नाराज झालेल्या समरजितसिंह घाटगे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
कागल मतदारसंघात मुश्रीफ यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार समरजितसिंह घाटगे आणि शिवसेनेचे संजयबाबा घाटगे असणार आहेत. त्यामुळे 'हाय व्होल्टेज'लढत याठिकाणी पहायला मिळणार आहे.