कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा काही रुग्णांना संसर्ग झाल्याचा संशय आहे. जवळपास 7 रुग्णांना याची बाधा झाल्याचा संशय असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी यांनी सांगितले. शिवाय गंभीर आजार असलेल्या आणि मधुमेह आहे, अशा सात रुग्णांनाच बाधा असल्याचा संशय माळी यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - कोरोना नियमांकडे दुर्लक्ष; कोल्हापुरात मोफत श्रीखंडासाठी नागरिकांची तुफान गर्दी
काय आहे म्युकरमायकोसिस ?
कोरोनावरील उपचारादरम्यान फंगल इन्फेक्शन होते. त्याला म्युकरमायकोसिस असे म्हणतात. हा एक बुरशीजन्य खूप जुना आजार आहे. मात्र, सद्या कोरोनामुळे रुग्णांची रोग प्रतिकाराशक्ती कमी होत असल्याने हा आजार कोरोना रुग्णांमध्ये बळावत आहे. यामध्ये प्रामुख्याने गंभीर आजारी किंवा ज्यांना मोठ्या प्रमाणात मधुमेहाचा आजार आहे त्यांना याच्या संसर्गाचा जास्त धोका आहे. कोरोना रुग्णांना वापरल्या जाणाऱ्या स्टिरॉइड्स औषधांमुळे सुद्धा हा आजार वाढण्याची शक्यता असते. मात्र, योग्य उपचार घेतल्यास यावर लवकरच झालेले इन्फेक्शन नियंत्रणात आणता येणे शक्य आहे. जर इन्फेक्शन जास्त प्रमाणात झाले असेल तर शस्त्रक्रिया करून ते काढावे लागते, अशी माहिती सुद्धा डॉक्टरांनी दिली.
कोल्हापूर जिल्ह्यात 7 रुग्ण
कोल्हापूर जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा काही रुग्णांना संसर्ग झाल्याचा संशय असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यामध्ये गंभीर आजार असलेले किंवा मधुमेह आहे, अशा रुग्णांचाच समावेश आहे. राज्यभरात असे काही रुग्ण आढळले असल्याने आपणही याची जिल्ह्यात काळजी घेत असून सरकारी, तसेच खासगी रुग्णालयांना सुद्धा याबाबत काय काळजी घेतली पाहिजे याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. शिवाय याचा दररोज आढावा घेतला जात असल्याचेही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी म्हणाले.
म्युकरमायकोसिसची लक्षणे पुढीलप्रमाणे :
1) नाक कोरडे पडणे
2) गळ्याला सूज येणे
3) गाल लाल पडणे
4) दात हिरड्यांपासून सुटून हालू लागणे
5) डोळा सुजणे
6) डोकेदुखी, डोळेदुखी समस्या आदी लक्षणे आहेत. यावर वेळीच उपचार केल्यास इन्फेक्शनवर नियंत्रण आणता येऊ शकते, असे डॉक्टरांनी सांगितले.
हेही वाचा - कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यात दारूच्या नशेत मित्राचा खून