कोल्हापूर - राज्यभरासह कोल्हापुरात देखील कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा होता. त्यामुळे जिल्ह्यातील लसीकरण मोहीम जवळपास बंदच पडली होती. जिल्ह्यातील एकूण लसीकरण केंद्रांपैकी 200हून अधिक लसीकरण केंद्र बंद होती. अनेक केंद्रांवर लसीकरण बंद झाले असल्याबाबत बोर्ड सुद्धा लावण्यात आले होते. मात्र, शनिवारी कोल्हापूर जिल्ह्याला 1 लाख डोस उपलब्ध झाल्याने लसीकरण मोहीम पुन्हा एकदा सुरू झाली आहे. काल दिवसभरात जिल्ह्यातील विविध ठिकाणी वीकेंड लॉकडाऊन असूनही लसीकरण मोहिमेला नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला. त्यामुळे रविवारी जिल्ह्यातील 41 हजार 130 लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली.
आत्तापर्यंत 10 लाख नागरिकांचे लसीकरण -
कोल्हापूर जिल्हा लोकसंख्येच्या तुलनेत लसीकरण मोहिमेत राज्यात सर्वात आघाडीवर आहे. आतापर्यंत जिल्ह्यात दहा लाखांहून अधिक लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. एकूण 250 केंद्रावर लसीकरण सुरू होते. जिल्ह्यामध्ये सध्या 16 लाख नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये 45 ते 59 वयोगटातील व्याधीग्रस्त व अन्य लाभार्थ्यांचा समावेश आहे. तर, 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. शुक्रवारी जवळपास 200हून अधिक केंद्र डोस उपलब्ध नसल्याने बंद पडली होती. केवळ 40 केंद्रांवर लसीकरण झाले. मात्र, आणखी 1 लाख डोस प्राप्त झाल्याने लसीकरण पुन्हा एकदा सुरळीत सुरू झाले आहे.
1 लाख 80 हजार डोस प्राप्त होणार -
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात ज्या वेगाने लसीकरण सुरू आहे ते पाहाता जिल्ह्यात दिवसाला 40 हजारांहून अधिक नागरिकांचे लसीकरण होत आहे. त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसातच मिळालेले 1 लाख डोस संपण्याची शक्यता आहे. याचाच विचार करून आणखी 1 लाख 80 हजार डोसची मागणी करण्यात आली आहे. येत्या बुधवारपर्यंत ते डोस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
शहरातही लसीकरणाला गर्दी -
कोल्हापूर शहरात एकूण 11 लसीकरण केंद्रांपैकी दोनच लसीकरण केंद्र सुरू होती. त्या ठिकाणीसुद्धा लसीकरण बंद पडण्याची शक्यता होती. मात्र, जिल्ह्याला 1 लाख डोस प्राप्त झाल्यामुळे आता पुन्हा एकदा शहरातील 11 केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. काल(रविवारी) दिवसभरात तब्बल 4 हजार 637 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे शहरात आतापर्यंत 91 हजार व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये 82 हजार जणांनी पहिला डोस तर 9 हजार लाभार्त्यांनी दुसरा डोस घेतला आहे. ज्या वेगाने लसीकरण होत आहे याचा विचार करून शहरासाठी आणखी 30 हजार डोसची मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा - वयाच्या पन्नाशीत दोन विहिरी खोदणारी 'कलियुगातील भागीरथ'