कोल्हापूर : कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांचे आज कोल्हापुरात प्रथमच आगमन झाले. शहरातील ताराराणी चौकात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने मंत्री मुश्रीफ यांचे जल्लोषी स्वागत केले. यानंतर ताराराणी चौकापासून बाईक रॅलीसह मंत्री हसन मुश्रीफ यांची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळावर मंत्री मुश्रीफ यांनी अभिवादन केले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौका-चौकातील डिजिटल फलक चर्चेत : कोल्हापूर शहराचे प्रवेशद्वार असलेल्या ताराराणी चौकात भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांच्या समर्थकांनी डिजिटल होर्डिंग उभारले आहे. तसे यावर निष्ठा हा शब्द ठळकपणे दर्शवण्यात आला आहे. पवार एके पवार अशी भूमिका मांडलेले कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी थेट भारतीय जनता पक्षाच्या सरकारला पाठिंबा देत सर्वांनाच अचंबित केले. यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी समरजीतसिंह घाटगे यांची पक्षावरील निष्ठा डिजिटल फलकांमधून अधोरेखित केली आहे. तर दुसरीकडे कोल्हापूर जिल्हा बँकेच्या मंत्री मुश्रीफ यांच्या गटातील संचालकांनी डिजिटल बोर्ड उभारले आहेत. त्यामध्ये काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या गटाच्या संचालकांचे फोटो मात्र गायब आहेत. या डिजिटल बोर्डांची खमंग चर्चा कोल्हापुरात रंगली आहे.
यापुढील राजकीय दिशा कागलमध्ये मांडणार : प्रथमच कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री मुश्रीफ यांचे कोल्हापुरात आज आगमन झाले. प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मुश्रीफ यांचे जल्लोषात स्वागत केले. मात्र रविवारपासून सुरू झालेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करण्यास मंत्री मुश्रीफ यांनी नकार दिला. यापुढील राजकीय वाटचाल कागलमध्ये सायंकाळी होणाऱ्या सभेतच मांडणार असल्याचे मंत्री मुश्रीफ म्हणाले. आठवडाभरापूर्वीच कोल्हापूर शहरात निघालेल्या सद्भावना रॅलीमध्ये अग्रस्थानी असलेले मंत्री मुश्रीफ यांनी या सभेमध्ये भाषण करताना भाजपाच्या जातीय राजकारणावर टीका केली होती. आता तेच मंत्री मुश्रीफ भाजपसोबत मंत्रिमंडळात नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार अशीही चर्चा सुरू होती.
हेही वाचा -
- Political Crisis विकासकामांसाठी मंत्री मुश्रीफ भाजपसोबत कागल मतदार संघातील सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया
- ED Raid Hasan Mushrif House : हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी ईडीची धाड; कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, घोषणाबाजी सुरु
- Mumbai HC On Hasan Mushrif : हसन मुश्रीफ यांना 'या' तारखेपर्यंत अटक करता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा