कोल्हापूर : किरीट सोमय्या निव्वळ माझ्या बदनामीचे षडयंत्र आहे. एक जरी आरोप खरा ठरला तर आमदारकीचा राजीनामा देईन. असे आमदार हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या मालकीच्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. ते पाप करू नका असेही आमदार हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. किरीट सोमय्या यांनी काल केलेल्या वक्तव्यानंतर मुश्रीफ यांनी त्यांचा समाचार घेतला. शिवाय ते वारंवार बेताल वक्तव्य करत चालले आहेत. त्यांना माझी लोकप्रियता माहिती नाही. किरीट सोमय्या यांना माझी लोकप्रियताच बघायची असेल तर, एका महिन्याच्या आत मी जनतेकडून 100 कोटी रुपये जमा करु शकतो असे ते म्हणाले.
100 कोटी एका महिन्यात जमतील असे लोकांचे प्रेम : यावेळी सोमय्या यांच्या आरोपांना उत्तर देताना मुश्रीफ म्हणाले, कायद्याने बंदी आहे म्हणुन मी शांत आहे. पण, किरीट सोमय्या यांना माझी लोकप्रियता पहायची असेल तर तसे सांगावे. मी जर, आज आवाहन केले तर एका महिन्यात 100 कोटी रुपये लोकं गोळा करून मला देतील एवढे प्रेम लोक माझ्यावर करतात. एव्हढा विश्वास मी माझ्या कामाच्या माध्यमातून लोकांमधून कमावला आहे असेही मुश्रीफ म्हणाले.
मी घाबरत नाही : शिवाय आम्ही कारखान्याच्या शेअर्ससाठी आवाहन केल्यानंतर एका महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे गोळा झाले. हे एक वेगळे उदाहरण आहे. आम्ही शेतकऱ्यांना त्या शेअर्सपोटी महिन्याला मोठा लाभ सुद्धा देत आलो आहे. त्यामुळे कोणतेही संकट आले तरीही मी त्याला न घाबरता पार करेल असेही मुश्रीफ म्हणाले.
तर, राजीनामा देऊ : सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना आमच्या तीनही मुलांनी शेतकऱ्यांच्या शेअर्स तसेच पाच नॅशनलाईज बँकांकडून कर्जे काढून उभा केला आहे. किरीट सोमय्या मात्र, सप्टेंबरपासून कोणतीही माहिती नसताना आमच्यावर आरोप करत आले आहेत. मी सुद्धा त्यांना वारंवार याबाबत बोललो होतो. आपण याबाबत माहिती घेऊन बोला. आम्ही 40 हजार शेतकऱ्यांचे 10 हजार प्रमाणे कारखाना उभारण्यासाठी खर्च केले असतील तर ठेवी ठेवण्याचे कारण काय? असाही सवाल आमदार हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या यांना उपस्थित केला. ही सगळी केवळ माझी बदनामी करण्यासाठी रचलेले षडयंत्र आहे. शिवाय यांच्या मागे जो बोलावता धनी आहे त्याला सुदधा आम्ही येत्या काळात उघडे केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा यावेळी मुश्रीफ यांनी दिला आहे.