कोल्हापूर - देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नाबाबत अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले. अनेक कामगारांना घरे कशी मिळतील त्यांच्या अडचणी काय आहेत त्या जाणून घेऊन घरे मिळवून दिली. मात्र, गेल्या वर्षभरापासून सर्वकाही ठप्प आहे. याच वेगाने जर काम सुरू राहील तर सर्वच गिरणीकामगारांना घरे मिळतील माहिती नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. शिवाय आता केवळ वाझेच वाझे सुरू आहे. मात्र, गिरणी कामगारांकडेही लक्ष देऊन त्यांना घरे मिळवून द्या, असेही चंद्रकांत पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हटले.
या सरकारने नेमकं कशावर काम करायचे ठरवले आहे ?
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, आजही अनेक गिरणी कामगार घरापासून वंचित आहेत. आमच्या सरकारच्या कार्यकाळात अनेकांना घर मिळाली. घरे मिळताना काही अडचणी होत्या त्या सुद्धा जाणून घेऊन त्या सोडवण्यात आल्या. मात्र, आत्ताच्या सरकारने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. मी स्वतः एका गिरणी कामगाराचा मुलगा आहे. माझ्यासारख्या अनेकांनी ठरवले आपल्याला गरज नाही. त्यामुळे आपण घरे मागायची नाहीत. मात्र, अनेकांना आजही घरांची गरज आहे. त्यामुळे सरकारने नेमके कशावर काम करायचे ठरवले आहे, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. सरकारने वीज बिलाचा विषय असो किंवा शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा विषय असो सगळीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता गिरणी कामगारांच्या प्रश्नाकडेही लक्ष देऊन त्या कामगारांना घरे देण्याची गरज आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
अजूनही हजारोंच्या संख्येने गिरणी कामगार वंचित
गिरणी कामगारांना जास्तीत जास्त घरे देण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न असणार आहे. कोणताही गिरणीकामगार घरापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात येईल, असे अनेकदा सरकारकडून सांगण्यात आले. मात्र, सद्यस्थितीत गिरणी कामगारांचा मुद्दा तसाच आहे. आजही हजारोंच्या संख्येने गिरणी कामगार घरांपासून वंचित आहेत. कोणाचेही या महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष नाही. ज्या गिरणी कामगारांमुळे मुंबई ओळखली जाते त्याकडेच सर्वांनी दुर्लक्ष केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अनेकवेळा गिरणी कामगारांच्या ऋणातून कधीही मुक्त होऊ शकणार नाही, अशी भावना व्यक्त केली आहे. त्यामुळे आता या विषयाकडे सुद्धा गांभीर्याने लक्ष देण्याची सुद्धा गरज असल्याच्या भावना गिरणी कामगारांनीही व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा - गोकुळ निवडणूक: महाविकास आघाडीबद्दल माहिती नाही, पण आम्हीही ताकद दाखवू
हेही वाचा - कोल्हापुरात महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसडा मारून लांबवली; घटना सीसीटीव्हीत कैद