कोल्हापूर - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. याकामी शासनाला आशा सेविका गावातील माहिती पुरवून मदत करत आहेत. पण आशा सेविकांना माहिती देण्यास टाळाटाळ आणि दमदाटी केल्याचा प्रकार पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावात घडला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या आशा सेविकांना काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोडोली गावातील महापुरे गल्लीत राजू महापुरे यांचे घर आहे. राजू महापुरे यांची पत्नी आणि मुलगा मुंबई येथून आल्याची ग्रामपंचायत कोरोना दक्षता समितीला आणि गावातील सर्व्हे करणाऱ्या आशा सेविकांना माहिती समजली. त्यानंतर आशा सेविका सुषमा चोपडे यांनी महापुरे यांच्या घरी जाऊन मुंबई येथून घरी कोणी नातेवाईक आले आहेत का? याबाबत माहिती विचारली.
तेव्हा राजू महापुरे यांनी माहिती देण्यास टाळाटाळ करून उलट सुषमा यांनाच दमदाटी केली. त्यामुळे संतप्त झालेल्या आशा सेविकांनी ग्रामपंचायत कार्यालयात जमून घडलेला सर्व प्रकार पन्हाळा पंचायत समिती सभापती गीतादेवी पाटील, समाज कल्याण माजी सभापती विशांत महापुरे, सरपंच शंकर पाटील यांना सांगितला. शिवाय राजू महापुरे यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करत याबाबतचे निवेदन दिले.
जो पर्यंत महापुरे यांच्यावर कारवाई होत नाही तो पर्यंत गावाच्या सर्व्हेचे काम करणार नाही, असा पवित्रा सर्व आशा सेविकांनी घेतला. यानंतर महापुरे यांनी माफी मागितली, तेव्हा आशा सेविकांनी काम करण्यास सुरूवात केली.
हेही वाचा - आम्हाला आमच्या घरी पाठवा, कोल्हापुरात शेकडो मजूर रस्त्यावर
हेही वाचा - कोल्हापुरातून बाराशे परप्रांतियांना घेऊन श्रमिक विशेष रेल्वे जबलपूरला रवाना