कोल्हापूर - भाजपकडून चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याबाबत मोहीम राबविण्यात येत आहे. सोशल माध्यमातून फोटो पोस्ट करुन बहिष्कार करण्याबाबत बोलले जात आहे. मात्र भाजपच्या हे फोटो चाईना मोबाईलमधील असतात याचे काय ? त्यामुळे भाजपने त्यांची नेमकी भूमिका काय आहे, हे स्पष्ट करने गरजेचे आहे. केंद्र सरकारने याबाबत लेखी स्वरुपात चीनवरील बहिष्काराबाबत स्पष्टीकरण दिले पाहिजे. त्यानंतर काँग्रेस आपली सुद्धा भूमिका स्पष्ट करेल असे म्हणत, या मोहिमेवर गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी टीका केली.
चीन सीमेवर शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे आज 'शहिदो को सलाम' कार्यक्रमाचे आयोजन करत मूक निदर्शन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील पापाची तिकटी परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जिल्हा काँग्रेसतर्फे शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
गृह राज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, भाजपने जवान शहीद झाले त्यानंतर काय कारवाई केली, हे स्पष्ट करावे. तसेच गलवान आपल्या भागात आहे, की नाही? पँगगाँग सरोवर आपल्या प्रदेशात येतंय की नाही, हे त्यांनीच स्पष्ट करावे. चीन सैन्याने त्या ठिकाणी बंकर्स बांधायला सुरुवात केली आहे, असे समजते. त्यामुळे ते एकीकडे घुसखोरी करत आहेत. याबाबत काहीच कारवाई नाही, याबाबत भाजपने स्पष्टीकरण द्यावे. मात्र मूळ विषय बाजूला ठेऊन इतर गोष्टी सांगतात हेच भाजप करत आलेले आहे असेही सतेज पाटील यांनी म्हटले.
यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आमदार पी. एन. पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.