कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत महायुतीमध्ये सामील झाले. यांच्यासोबत कोल्हापूरचे कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ आणि चंदगड विधानसभेचे आमदार राजेश पाटील हे देखील मुश्रीफ यांच्यासोबत गेल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा फटका बसला. तर अनेक कार्यकर्ते देखील विभागले गेले. याच पार्श्वभूमीवर आपण घेतलेला निर्णय हा का घेतला हे सांगण्यासाठी आज कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मेळावा घेण्यात आला. यावेळी जिल्ह्याचे आमदार, नवनियुक्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेला आम्ही कुठे विरोध केला नाही. शरद पवार हे आमचे विठ्ठल आहेत आणि विठ्ठलच राहणार आहेत असे हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.
म्हणून अजित पवारांना साथ : हसन मुश्रीफ म्हणाले की, माझ्यावर कोणतीही ईडी कारवाई नव्हती. सध्या ईडीच्या कारवाईत न्यायालयाने मला दिलासा दिला आहे. न्यायालय मला योग्य तो न्याय देईल असे म्हणत त्यामुळे ईडीच्या भीतीने मी सत्तेत गेलो हे डोक्यातून काढून टाका. मी केवळ राज्याच्या विकासासाठी आणि पक्ष बळकट करण्यासाठी अजित पवारांना साथ देण्याचे ठरवले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या गटावर टीका करू नका, त्यांचे काम त्यांना करू द्या. आपण आपले काम प्रामाणिकपणे पार पाडा, असेही ते म्हणाले आहेत.
त्यामुळं माझं नाव श्रावणबाळ : मंत्रिपदाचा शपथविधी झाल्यानंतर आठवडा ओलांडला तरी देखील खातेवाटप झाले नव्हते. यामुळे महायुतीमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र काल खातेवाटप झाले आणि हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्यक खाते देण्यात आले. याबाबत त्यांनी बोलताना मला मिळालेल्या दोन्ही खात्यांमध्ये काम करण्यात मला आनंद आणि इंटरेस्ट आहे. माझ्याकडे यापूर्वी विधी व न्याय खाते होते. यावेळी पंचतारांकित व सप्ततारांकित रुग्णालयात कायदा करून मोफत उपचार आणि लाखो ऑपरेशन करण्यामध्ये यश मिळवले होते. यामुळेच आज देखील आठवड्याला 20 ते 25 रुग्णांना मुंबईत ऑपरेशनला घेऊन जातो. विविध योजना आणल्या. वृद्ध दाम्पत्यांसाठी श्रावण बाळ योजना देशात मीच पहिल्यांदा आणली. त्यामुळे माझे नाव श्रावणबाळ पडले, असेही मुश्रीफ यावेळी म्हणाले आहेत.
पण धरणं भरू दे : कोल्हापुरातील अनेक प्रश्न मार्गी लावायचे आहेत. यंदाच्या दिवाळीला थेट पाईपलाईनच्या पाण्याने आंघोळ करणार. मात्र पाऊस पडला पाहिजे, असे म्हणत त्यांनी गाढवा-गाढवीची लग्न लावा; पण पावसासाठी प्रार्थना करा. महापूर आला तरी चालेल पण धरणं भरू दे, असेही ते म्हणाले आहेत.
हेही वाचा: