कोल्हापूर - गेल्या 10 दिवसापासून कोल्हापुरातील मसाई पठारावर पर्यटकांची प्रचंड गर्दी वाढली आहे. शनिवार आणि रविवारी तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोरोना संसर्गाचा धोका पाहता आसपासच्या गावकऱ्यांना सुद्धा काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी मासाई पठार पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
एकीकडे जिल्हा कोरोनामुक्तीकडे जात होता, पण चार दिवसापासून पुन्हा रुग्णांची संख्या वाढत असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 100 पार गेली आहे. त्यामुळे पर्यटकांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये या दृष्टिकोनातून जेऊर ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता समितीने मसाई पठार पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी सुद्धा पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. परिणामी गावकऱ्यांना पोलिसांची मदत घेत गर्दीवर नियंत्रण मिळवावे लागले.
काही पर्यटकांनी पोलिसांशी हुज्जत सुद्धा घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पर्यटकांनी स्वतः काळजी घेऊन आपली गैरसोय करून घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. जोपर्यंत राज्य सरकारकडून पर्यटनाच्या संदर्भात कोणत्याही मार्गदर्शक सूचना मिळत नाहीत, तोपर्यंत कोरोना दक्षता समितीने मसाई पठार बंद करण्याचा निर्णय घेतला असून पर्यटकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.