कोल्हापूर - कन्नड संघटनेने बेळगाव महापालिकेसमोर लावलेल्या ध्वजाविरोधात मराठी भाषिकांनी उद्या बेळगावमध्ये भव्य मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते. मात्र, मोर्चाला बेळगाव पोलिसांनी परवानगी नाकारली असल्याने उद्याचा मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. झेंड्याबाबत उद्या जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये जर प्रश्न सुटला नाही, तर आम्ही मोर्चा काढणारच असल्याचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा अध्यक्ष शुभम शेळके यांनी म्हटले.
हेही वाचा - ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर कोल्हापुरात अनेक ठिकाणी राडा, अनेकांविरोधात गुन्हे
दरम्यान, बेळगाव पोलिसांनी कोणत्याही परिस्थितीत बाहेरगावाहून या ठिकाणी नेतेमंडळी किंवा कार्यकर्ते यांना येण्यास निर्बंध लागू करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. शिवाय नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.
कोणत्याही परिस्थितीत भगवा फडकविणार -
कन्नड संघटनेने लावलेल्या ध्वजाविरोधात उद्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सरदार मैदान येथून सकाळी 11 च्या दरम्यान या मोर्चाला सुरुवात होणार होती. मात्र, बेळगाव पोलिसांनी उद्याच्या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक पार पडणार आहे. त्यामुळे, उद्याचा मोर्चा सुद्धा स्थगित करण्यात आल्याचे समितीने म्हटले आहे. मात्र, एकीकडे मोर्चा रद्द जरी झाला असला, तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसैनिक बेळगावमध्ये जाऊन भगवा फडकवणारच असल्याचे कोल्हापूर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी म्हटले. त्यामुळे, उद्या नेमके काय होणार, हे पाहावे लागणार आहे.
हेही वाचा - कोल्हापूर-पुणे नवीन रेल्वेमार्गासंबंधी 15 दिवसात अहवाल सादर करा - सतेज पाटील