कोल्हापूर - मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींवर शासनाला योग्य वाटेल असा व्यक्ती प्रशासक म्हणून नेमण्याबाबतचा अध्यादेश राज्य शासनाने राज्यपालांच्या स्वाक्षरीने काढला आहे. या अध्यादेशानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायत सदस्याने योग्य व्यक्तीची नेमकी व्याख्या काय? असा थेट सवाल मुख्यमंत्र्यांसह, ग्रामविकास मंत्री, आणि राज्यपालांना पत्राद्वारे केला आहे.
राजू मगदूम, असे या ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. हजारोंच्या लोकसंख्येच्या गावांमध्ये शासन योग्य व्यक्ती ठरवणार कसे? त्या गावांमध्ये एकच योग्य व्यक्ती असेल, तर त्या गावातील बाकीचे सर्व व्यक्ती मग अयोग्य असणार काय? शासन आपल्या सोईनुसार अध्यादेश काढत आहे. प्रशासक नेमताना तरी किमान राजकारण करू नये, अशी विनंती सुद्धा राजू मगदूम यांनी केली आहे.
चुकीच्या प्रकारे राज्यातील ग्रामपंचायतींवर प्रशासनाने प्रशासक नेमला तर गावातील बसलेली घडी विस्कटून जाईल. आतापर्यंतच्या सरपंचांनी व विद्यमान सदस्यांनी कोरोनासारख्या महामारीला गावात येण्यापासून रोखले. ती महामारी आता संपूर्ण ग्रामीण भागांमध्ये पसरून अनेक ग्रामस्थांचे जीव जातील आणि याची जबाबदारी सर्वस्वी राज्य शासनावर असेल, असेही त्यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. शिवाय गेल्या पाच वर्षांपासून गावचा गाडा चालवणारे आणि कोरोना महामारीपासून गावाचे रक्षण करणारे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य हे अयोग्य आहेत काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार योग्य व्यक्ती म्हणजे कोण? योग्य व्यक्तीची व्याख्या काय? याची माहिती द्यावी, अशी त्यांनी केली आहे.