कोल्हापूर - कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील फुलेवाडी बालिंगा रस्त्यावर खड्ड्यात गाडी जाऊन एका दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराच्या पत्नीला गंभीर दुखापत होऊन पाय मोडल्याने संतप्त तरुणाने मार्गावर झोपून रस्ता अडवत आंदोलन सुरू केले. विजय पोरे असे संतप्त आंदोलनकर्त्याचे नाव आहे.
फुलेवाडीकडून बालिंगाकडे जाणारा मार्ग हा खड्ड्यांमूळे वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरत आहे. विजय हे आज(शुक्रवार) आपल्या दुचाकीवरून पत्नीसह फुलवाडीकडून बालिंगाकडे जात होते. दरम्यान रस्त्यावरील खड्ड्यात गाडी गेल्याने दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये विजय यांच्या पत्नीचा पाय मोडला व डोक्याला सुद्धा गंभीर दुखापत झाली. यामुळे संतप्त विजयने सदर रस्त्यावर झोपून आंदोलन केले.
हेही वाचा - सरकारने केलेली कर्जमाफी नेमकी कोणासाठी? राजू शेट्टींचा सवाल
कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील फुलेवाडी-बालिंगा दरम्यानच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. या खड्ड्यांमुळे आत्तापर्यंत अनेक अपघात घडले असून हा रस्ता प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. मात्र, प्रशासन याकडे डोळझाक करत असल्याचे दिसून येते. आज विजय आणि त्यांच्या पत्नीवर या खड्डयांमुळे अपघाताची वेळ आली. यामध्ये विजय यांच्या पत्नी गंभीररित्या जखमी झाल्याने संतप्त विजयने रस्त्यावरच झोपून आंदोलन केले.
हेही वाचा - कोल्हापूर-मुंबई विमानसेवा उद्यापासून पूर्ववत; 7 डिसेंबरपासून तांत्रिक कारणांमुळे होती बंद