कोल्हापूर - गेल्या काही दिवसात झालेल्या प्रचंड अतिवृष्टीमुळे कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या आंबा घाटात जवळपास 15हून जास्त ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे येत्या काही महिन्यात या घाटातून अवजड वाहनांना प्रवेश बंदी असेल, तर येत्या चार दिवसात दुचाकी आणि चारचाकी वाहनांना या मार्गावरून वाहतूक करण्यास परवानगी दिली जाईल, असे संकेत राष्ट्रीय महामार्गाचे कनिष्ठ अभियंता कौशिक रहाटे यांनी दिले आहेत.
जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक ठप्प
कोल्हापूर आणि कोकणाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग म्हणजे आंबाघाट होय. या मार्गावरून औद्योगिक, मालवाहू तसेच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक होत असते. मात्र गेल्या पंधरा दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबा घाटात जवळपास पंधरा ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. कोल्हापूर ते रत्नागिरी हा महत्त्वाचा मार्ग असल्याने समुद्रमार्गे होणारी वाहतूक याच मार्गाने केली जाते. पंधरा ठिकाणी दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक सध्या बंद करण्यात आली आहे. त्यामुळे भाजीपाला, औद्योगिक, वाहतूक तसेच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक ठप्प झाली आहे. तर पुढील धोका लक्षात घेता येणारे काही महिने हा रस्ता अवजड वाहतुकीसाठी बंद असणार असल्याचे संकेत राष्ट्रीय महामार्गाचे कनिष्ठ अभियंता कौशिक रहाटे यांनी दिली आहेत.
पाहणीनंतर निर्णय
पुढील दोन ते तीन दिवसात हा रस्ता चारचाकी आणि दुचाकींसाठी खुला करण्यात येईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. दरम्यान, अवजड वाहनांची वाहतूक करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी पुन्हा पाहणी करण्यासाठी येणार आहेत. त्यानंतरच अवजड वाहतुकीसंबंधीचा निर्णय घेतला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.