कोल्हापूर - गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील मराठी भाषिकांवर अन्याय सुरू आहे. कर्नाटक सरकार मोठ्या प्रमाणात दडपशाही करत आहे. महाराष्ट्र शासनाने या प्रकरणामध्ये लक्ष घालून सीमाभागातील 40 लाख मराठी भाषिक जनतेला महाराष्ट्रात सामावून घ्यावे, अशी विनंती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते प्रकाश मरगाळे यांनी केली आहे.
कोरोनाचे कारण देत कार्यक्रमांना परवानगी नाकारली -
आज कर्नाटकचा स्थापना दिन आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिक नागरिकांना काळा दिन पाळण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने केले होते. त्यानुसार सर्वांनी कर्नाटक सरकारच्या दडपशाहीला न जुमानता काळा दिन पाळला. गेल्या अनेक वर्षांपासून कर्नाटक सरकार सीमाभागातील जनतेची मुस्कटदाबी करत आहे. यावर्षीही कोरोनाचे कारण पुढे करत कुठलाही कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी भूमिका सरकारने घेतली होती. शेवटच्या क्षणापर्यंत कार्यक्रमांना परवानगी दिली नाही.
महाराष्ट्र शासनाने लक्ष द्यावे -
कर्नाटक सरकारने कार्यक्रमांना परवानगी दिली नाही. मात्र, कोणत्याही दबावाला बळी न पडता संपूर्ण बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिक गावांनी काळा दिन पाळला. सीमाभागाला आज पोलीस छावणीचे स्वरुप आले असून बेळगाव शहरात कोणालाही बाहेर फिरता येत नाही. कर्नाटक सरकारची ही दडपशाही आहे. आता महाराष्ट्र शासनाने यात लक्ष घालून सीमाभागातील मराठी भाषिकांना महाराष्ट्रात सामावून घ्यावे, अशी विनंती मरगाळे यांनी केली.