कोल्हापूर - शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. चार दिवसांपासून तर दररोज दीडशे ते दोनशे रुग्ण वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी तसेच कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. पुढील 7 दिवस जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. आज सकाळपासून कोल्हापुरात लॉकडाऊनला सुरूवात झाली असून सकाळपासून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
शहरातील सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून केवळ अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडता येणार आहे. यामध्ये फक्त मेडिकलसाठी सूट देण्यात आली आहे. शिवाय जिल्ह्यात दूध पुरवठा, बँका आणि उद्योग व्यवसाय यांना सुद्धा 25 टक्के कामगारांवर सुरू करता येणार आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 हजार 250 हून अधिक झाली आहे, तर जवळपास 53 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर शहरासह इचलकरंजी, चंदगड, गडहिंग्लज तालुक्यात सुद्धा रुग्णांची दररोज मोठ्या संख्येने वाढ होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पुढील 7 दिवस कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील लॉकडाऊनच्या आजच्या पहिल्या दिवशीचा आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी आढावा घेतला आहे.