कोल्हापूर - शहरातील तिसरीमध्ये शिकणाऱ्या चिमुकलीने एक अनोखे रेकॉर्ड केले आहे. भारतीय घटनेतील प्रस्तावनेसह 35 कलमे आणि उपकलमे तिने पठण केले असून यासाठी तिने केवळ 6 मिनिटे 10 सेकंद इतका वेळ घेत विक्रम प्रस्थापित केला आहे. तिच्या या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसह एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. तिच्या या अनोख्या कामगिरीनंतर तिला 'ग्रँड मास्टर' हा किताब सुद्धा बहाल करण्यात आला आला आहे.
विशेष म्हणजे अनुप्रियाला यासाठी काही मिनिटेच वेळ लागू लागला. इतक्या लहान वयात आणि विशेष म्हणजे भारतीय घटनेतील इतकी कलमे पाठ केली असल्याने तिच्या आई अक्षता गावडे यांनी तिची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसह एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यासाठी अर्ज केला. तिकडून सुद्धा तत्काळ हिरवा कंदील आल्यानंतर अनुप्रियाचा व्हिडिओ करून पाठविण्यात आला. इंडिया आणि एशिया बुक मध्ये नोंद होण्यासाठी अनेक अटी होत्या, त्याकडे लक्ष देऊन व्हिडिओ करावा लागला. अवघ्या 8 वर्षे 8 महिन्याच्या अनुप्रियाने भारतीय घटनेतील प्रस्तावना, भाग 1, 2 आणि 3 मधील कलमे तसेच उपकलमे केवळ 6 मिनिटे 10 सेकंदात पठन केल्याने तिच्या नावाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसह एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद झाली.
आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून अनुप्रियाचे कौतुक -
अनुप्रियाच्या या कामगिरीमुळे कोल्हापूरचे नाव अधिक उज्वल झाले असून याचा मला अभिमान असल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी म्हंटले आहे. शिवाय एकीकडे बेटी बचाओ बेटी पढाओ हे सांगावे लागत असताना गावडे कुटुंबीयांनी 'बेटी को सपोर्ट करो और दुनिया मे आगे लाओ' हा संदेश दिला आहे. याच बरोबर त्यांनी तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छाही यावेळी दिल्या आहेत.
अनुप्रियाची आजपर्यंत विविध स्पर्धेत कामगिरी -
अनुप्रिया लहान असल्यापासून अभ्यासात अतिशय हुशार आहे. तिने आजपर्यंत अनेक स्पर्धेत भाग घेत पारितोषिके पटकावली आहेत. विशेष म्हणजे गणित ऑलिम्पियाड परीक्षेत जगात आठवा क्रमांक, आय क्यू ऑलिम्पियाड परीक्षेत देशात दहावा क्रमांक तर ब्रेनडेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत देशात 17 वा क्रमांक पटकावला आहे. आता तर तिच्या नावाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसह एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद झाली आहे.